कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जोडीला देणार पाच कार्याध्यक्ष - mpcc president with five exicutive president | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जोडीला देणार पाच कार्याध्यक्ष

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

 प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा जोरात असतानाच त्यांच्या जोडीला तब्बल पाच कार्याध्यक्ष देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे : प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा जोरात असतानाच त्यांच्या जोडीला तब्बल पाच कार्याध्यक्ष देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यात आमदार प्रणिती शिंदे, कुणाला पाटील, कैलास गोरंट्याल माजी खासदार हुसेन दलावाई, माजी मंत्री वसंत पुरके यांची नावे चर्चेत आहेत.

या नेमणुकांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्र या विभागातून हे कार्याध्यक्ष नेमल्याने प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाना पटोले हे आज पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीत होते. मात्र, त्याच्या नावाची अधिकृत घोषणा रात्री उशीरापर्यंत झाली नाही. पटोले यांनी प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासोबत मंत्रीपद मागितल्याने त्यांचे नाव मागे पडल्याची चर्चा होती. मात्र, पुन्हा गेल्या दोन दिवसात पटोले यांचे नाव आघाडीवर आल्यचे पक्षात बोलले जात आहे. कॉंग्रेसने मुंबईत देखील कार्याध्यक्ष देऊन नवीन पायंडा पाडला आहे. त्यांची पुनरावृत्ती आता प्रदेश पातळीवर होऊ शकते, असे पक्षातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. नाना पटोले अध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. काही आमदारांचा गट विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच पुढे पदावर राहू द्यावे या मताचा आहे. त्यामुळे घडामोडी घडत असल्या तरी कॉंगेसमध्ये खरेच खांदेपालकट होणार का याची उत्सुकता आहे.

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा सुरू झाल्यापासून अनेक नावांची चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार राजीव सातव, आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांचा यात समोवश होता. मात्र, गेल्या काही दिवसात ही सारी नावे मागे पडून नाना पटोले यांचे नाव पुन्हा एकदा पुढे आले आहे. पटोले यांना अध्यक्षपद मिळणार नाही, असे सांगणारा एक गट पक्षात सक्रिय आहे. पटोले हे पक्षाबाहेर जाऊन आलेले असल्यानेत्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळू शकत नाही. बाहेर जाऊन आलेल्या व्यक्तीला थेट पक्षाचे अध्यक्ष करण्याची पक्षात परंपरा नाही, असे दावा या गटाकडून करण्यात येतो. मात्र, पटोले यांचे नाव नक्की झाले असून त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे छातीठोकपणे सांगण्यात येत आहे. पटोले प्रदेशायक्ष झाले तर त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल. पटोले यांची बहुजन अशी प्रतिमा असल्याने त्याचा पक्षाला निवडणुकांमध्ये फायदा होईल, असा दावा करण्यात येत आहे.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख