खासदार श्रीरंग बारणेंना 'गद्दार' म्हणणे पडले महागात; पोलिसांनी बजावली नोटीस

Shrirang Barane | Shivsena | Eknath Shinde : बारणे यांना गद्दार म्हणणे शिवसेना पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले
Pimpri-chinchwad Politics| MP Shrirang Barane
Pimpri-chinchwad Politics| MP Shrirang BaraneSarkarnama

पिंपरी : शिवसेनेतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बंडानंतर पक्षात दोन भाग पडले आहेत. त्यानंतर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातील शिवसेनेकडून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना सातत्याने 'गद्दार' म्हणून हिणवले जात आहे. मात्र हेच हिणवणे ठाकरे गटातील एका शिवसेना पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. अशा संदर्भातील एका व्हाटसअॅप मेसेजला प्रक्षोभक समजून पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांना सीआरपीसी १४९ ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत.

४० आमदारानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदेंच्या बंडात सामील झाल्यानंतर खराडे यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. या खासदारांत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचाही समावेश आहे. त्यानंतर नुकतेच त्यांचे समर्थक मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर व इतर काहींनीही शिंदे गटाला समर्थन दिले. त्यानंतर मावळात शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

दरम्यान, या बंडानंतर शिवसेनेचे जुने एकनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा अधिक सक्रिय झाले आहेत. त्यात खराडे यांचा समावेश आहे. त्यांनी एकनिष्ठ शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला असून पक्षाची पुर्नबांधणी पुन्हा जोमाने सुरु केली आहे. त्यातही शिंदे गटात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या गावात ते बैठका घेत आहेत. हे काम सुरु असताना ही नोटीस मिळाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

पुणे ग्रामीणमधील लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे एपीआय संदेश बावकर यांनी खराडे यांना पोलिस ठाण्यावर बोलावून ही नोटीस बजावली. कट्टर शिवसैनिकांच्या व्हाटसअॅप ग्रुपमध्ये प्रक्षोभक मेसेज टाकल्यामुळे मावळ तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तो होऊ न देण्याची दक्षता घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसीव्दारे खराडे यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, अश्या नोटीस आपल्यासाठी नव्या नसून पक्ष व समाजासाठी अशा आणखी नोटीस घेण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया खराडे यांनी सरकारनामाला बोलताना दिली. कट्टर शिवसैनिक एकवटत असल्याचा धसका गद्दारांनी घेतला असून ते पोलिसांमार्फत आम्हाला रोखण्याचा व आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला भीक घालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत अशा पन्नासेक नोटीसा मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in