शिवसेनेशी फटकून राहणाऱ्या आमदार सावंताना ठाकरेंच्या समितीत स्थान   - MLA Tanaji savant appointed in PMRDA commitee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शिवसेनेशी फटकून राहणाऱ्या आमदार सावंताना ठाकरेंच्या समितीत स्थान  

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

आमदार सावंत हे फडणीस सरकारच्या शेवटच्या काळात जल संधारण मंत्री होते.

पुणे : राज्य मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत (Tanaji Savant) यांना ‘पीएमआरडीए’च्या नियोजन समितीवर स्थान देऊन शिवसेनने आमदार सावंत यांना गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.(MLA Tanaji savant appointed in PMRDA commite) 

आमदार सावंत हे फडणीस सरकारच्या शेवटच्या काळात जल संधारण मंत्री होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोट्या धरणफुटीनंतर त्यांनी केलेले वक्तव्य त्यावेळी बरेच गाजले होते. त्यावरून सावंत यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. त्याच काळात त्यांच्याकडे शिवसनेची सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. या काळात त्यांचे जिल्ह्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांशी पटले नाही. त्यानंतर विधानसभा निवडणूक जाहीर झाली.या निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट होऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, आमदार सावंत यांना चांगल्या खात्याची अपेक्षा असताना त्यांना मंत्रींमडळात समावेशदेखील होऊ शकला नाही.उद्धव ठाकरे यांच्या नाराजीमुळे आमदार सावंत यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकले नाही, असे आता सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची नाराजी नसती तर या मंत्रीमंडळात सावंत यांच्याकडे महत्वाचे खाते आले असते, असे बोलले जाते. या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर गेले दीड वर्ष आमदार सावंत फारसे चर्चेत नव्हते. शिवसेनेच्या संघटनेतही ते फटकून वागत होते. 

आमदार सावंत यांचे पुणे परिसरात शिक्षण संस्थेचे माठे जाळे आहे.अनेक शाळा-महाविद्यालयांचे ते मालक आहेत.या काळात त्यांनी आपल्या संस्थांच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते. मात्र,‘पीएमआरडीए’च्या निमित्ताने पक्षाने त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिल्याचे मानले जात आहे.

‘पीएमआरडीए’च्या निमित्ताने आमदार सावंत यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. यावेळी कोणतीही चूक न करता आमदार सावंत यांनी आपल्या कामाला न्याय दिला तर त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत जागा मिळू शकते, असे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख