बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीत विजय आपलाच होईल..

बैलगाडा शर्यतीची (Bullock Cart Race) सुनावणी आता स्वतंत्र होणार
bull cart race
bull cart racesarkarnama

पिंपरी : बैल हा घोड्यासारखा पळणारा प्राणी असून त्याची धावण्याची क्षमता आहे, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज (ता.6 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) करण्यात आला. त्यासाठी खिलार बैलाचे व त्याच्या शर्यतीचे फोटो न्यायालयाला सादर कऱण्यात आले. त्यातून बैल हा शर्यतीचा प्राणी असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते न्यायालयाला पटले तर बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, बैलगाडा शर्यतीची केस ही तमिळनाडू आणि कर्नाटकातील शर्यतींना न जोडता महाराष्ट्राचे म्हणणे स्वतंत्र ऐकून घेण्याची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे त्यासाठी वेळेअभावी या खटल्याची सुनावणी आता येत्या 15 डिसेंबरला होणार आहे. आता स्वतंत्र आणि वेगात सुनावणी होणार असल्याने लवकर निकाल येण्याची शक्यता वाढली आहे.

bull cart race
तारीख पे तारीख: बैलगाडा शर्यतीवरील पुढील सुनावणी 15 डिसेंबरला

सुनावणीसाठी पु्न्हा तारीख पडल्याने बैलगाडा शर्यतीच्या बारीसाठी शौकिनांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे बैलगाडा शौकीन व ही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा करणारे आमदार महेश लांडगे हे यासाठी खास दिल्लीला गेले होते. त्यांच्याबरोबर पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहूल जाधव, तसेच, अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे संदीप बोदगे देखील होते. बोदगे यांनी आज झालेल्या सुनावणीबाबत 'सरकारनामा'ला माहिती दिली.

bull cart race
अमोल कोल्हे म्हणाले, `या दोन 'पाहुण्यांना' आजवर घराबाहेरच ताटकळत ठेवलयं!`

गेली तीन वर्षे सुनावणीच न झालेला बैलगाडा शर्यत बंदीसंदर्भातील खटला गेल्या आठवड्यात बोर्डावर आला. तेव्हा वीस मिनिटांची सुनावणी होऊन आजची तारीख पडली होती. आजही तेवढाच वेळ ती झाली. महाराष्ट्राच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी आपली केस (बैलगाडा शर्यत बंदीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेले आव्हान) ही तमिळना़डू आणि कर्नाटकातील शर्यतींशी संलग्न न करण्याची व महाराष्ट्राची त्यासंदर्भातील आपली बाजू स्वतंत्रपणे ऐकून घेण्याची मागणी केली. या दोन राज्यांत तेथील कायद्यांन्वये शर्यती सुरु आहेत. तर, देशात इतरत्रही अशा विविध प्रकारच्या प्राण्यांच्या शर्यती अवैधपणे सुरु आहेत, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आव्हान याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची त्यांनी मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. ती ऐकण्यासाठी पुढील सुनावणी 15 तारखेला घेण्याचे न्या. खानविलकर आणि न्या. रवीकुमार यांनी जाहीर केले. दरम्यान, बैल हा धावू शकणारा प्राणी असल्याचा राज्य सरकारच्या समितीचा अहवालही न्यायालयाला सादर करण्यात आला आहे.

न्यायालयीन लढाईत यशस्वी होवू : आ.लांडगे

2011 पासून राज्यातील बैलगाडा शर्यतप्रेमी आणि शेतकरी बैलगाडा शर्यतीचा न्याय मागत आहेत. 2017 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने कायदा केला. मात्र, प्राणीप्रेमींनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे न्यायालयाने या शर्यतीवर पुन्हा बंदी आणली. त्याला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, गेले तीन वर्षे हा खटलाच बोर्डावर न आल्याने त्यावर सुनावणीच झाली नव्हती. गेल्या आठवड्यात पहिल्यांदा ती झाली. या न्यायालयीन लढाईत बळीराजा आणि बैलगाडा शौकीन निश्चितपणाने विजयी होणार आहे, अशी खात्री आजच्या सुनावणीनंतर आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.विजयाची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले. या लढ्यात यशस्वी होणार असून, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा अधिकार आम्हाला निश्चितपणे मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त लांडगेंनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन परिसरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करुन या महामानवाला अभिवादन केले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, अनिल आण्णा लांडगे, संभाजी घारे, महेशबापू शेवकरी व अतुल बोराटे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com