पुणे : पुण्यातील पर्वती मतदारसंघातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील बंगल्यातून 18 लाख रुपयांचे दागिन्यांची चोरी झाली आहे. चोरीच्या या प्रकरणात परिचयातील व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद होऊन पंधरा दिवस उलटले, मात्र अजूनही पोलिसांना चोरट्याचा शोध लागलेला नाही.
याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय 51, रा. बंगला क्रमांक 2, फेअर रोड, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ममता या आमदार माधुरी मिसाळ यांच्या जाऊ आहेत. मिसाळ कुटुंबाने दिवाळीच्या सणाच्यावेळी परिधान करण्यासाठी बॅंकेच्या लॉकरमधून 14 लाख रुपये किंमतीचा हिरेजडीत सुवर्णहार व चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे कडे असे दागिने असलेला बॉक्स घरी आणला होता. ते दागिने दिवाळीमध्ये परिधान केल्यानंतर ममता मिसाळ यांनी त्यांच्या बेडरुममधील कपाटात ठेवले होते. त्यानंतर आमदार मिसाळ यांच्यासह ममता यांना 18 तारखेला एका कामानिमित्त मुंबईला जायचे होते. तेथून आल्यानंतर त्यांनी घरामध्ये दागिन्यांचा शोध घेतला. परंतु ममता यांना त्यांच्या कपाटामध्ये दागिने आढळले नाहीत. त्यांनी संपूर्ण घरामध्ये दागिन्याचा शोध घेतला. तरीही दागिने न सापडल्याने त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात 29 नोव्हेंबरला फिर्याद दाखल केली.
दरम्यान, आमदार मिसाळ यांनी त्यांच्या घराच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे सुमारे एक महिन्यांचे चित्रीकरण पोलिसांकडे सुपुर्द केले आहे. दागिने चोरी करणारी व्यक्ती मिसाळ यांच्या कुटुंबीयांच्या परिचयाच्या असल्याचा त्यांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली.
"दिवाळीच्या सणासाठी बॅंकेतुन सोने घरी आणले होते. त्यानंतर ते पुन्हा बॅंकेत जमा करायचे होते. त्यापुर्वीच कोणीतरी घरातून दागिने चोरुन नेले. पोलिसांकडे फिर्याद देऊन 15 दिवस झाले. पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणही दिले. परंतु अजूनही पोलिसांना चोरटे सापडले नाहीत. पोलिसांकडून आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरीकांची काय स्थिती असेल?''
माधुरी मिसाळ, आमदार

