आमदार लक्ष्मण जगताप यांना डिस्चार्ज; तब्येत ठणठणीत : कार्यकर्त्यांसाठी दिवाळीचा दिवस

Laxman jagtap | शहर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण
आमदार लक्ष्मण जगताप यांना डिस्चार्ज; तब्येत ठणठणीत : कार्यकर्त्यांसाठी दिवाळीचा दिवस
Laxman Jagtap News in MarathiSarkarnama

पिंपरी : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांना तब्बल पन्नास दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर गुरुवारी (ता.२) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ते १२ एप्रिलपासून बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल होते. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी सुरु असताना त्यांना डिस्चार्ज मिळाल्याने शहर भाजपच्या (BJP) गोटात मोठा आनंद पसरला आहे. जगताप यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची बातमी समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ते रुग्णालयातून घरी येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. (Laxman Jagtap health latest news)

पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे प्रेम आणि प्रार्थना तसेच डॉक्टरांचे उपचार यामुळे जगताप यांची प्रकृती चांगली झाल्याचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले, आणि सर्वांचे आभार मानले. शंकर जगताप पुढे म्हणाले, डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पण ते लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरूवात करतील, त्यावेळी ते सर्वांनाच भेटतील. आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये, असे आवाहनही शंकर जगताप यांनी केले. या कठीण काळात शहरातील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिलेले प्रेम संपूर्ण जगताप कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

नुकतीच टर्म संपलेल्या पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता होती. सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. त्यासाठी शंभर प्लस नगरसेवकांचा नारा अगोदरच देण्यात आला आहे. २०१७ ला ही सत्ता आणण्यास आमदार जगतापांचा सिंहाचा वाटा होता. ते व भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यामुळे १५ वर्षाची राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिंपरी पालिकेतील सत्ता २०१७ ला गेली होती. दरम्यान २०२२ च्या पालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यासाठी नुकतेच आरक्षणही जाहीर झाले.त्यानंतर लगेचच आ. जगताप यांना पावणेदोन महिन्यांच्या वैद्यकीय उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्याने हा शुभसंकेत असल्याचे शहर भाजपमधून सांगण्यात आले.

आमदार जगताप हे अमेरिकेत उपचार घेऊन आले होते. त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १२ एप्रिलला बाणेरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना नंतर व्हेंटीलेटर लावण्यात आला होता. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. दरम्यान, अमेरिकेहूनच मागविलेल्या लाखमोलाच्या इंजेक्शनमुळे त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यामुळे त्यांची कृत्रिम श्वासोश्वासाची यंत्रणा तथा व्हेंटीलेटर २० एप्रिलला काढण्यात आला अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्यानंतर गत महिन्यात १२ तारखेला रुग्णालयाच्या खिडकीत येऊन त्यांनी हात हलवित आपल्याला बरे वाटत असल्याचा संदेश आपल्या हितचिंतकांना दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in