संतापलेल्या अशोक पवारांनी अवघ्या १० मिनिटांतच रेशनकार्ड मिळवून दिले!

मुख्य प्रशासकीय इमारतीच्या एका बाजूला बाकड्यावर एक महिला विमनस्क स्थितीत बसल्याचे आमदार पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले.
संतापलेल्या अशोक पवारांनी अवघ्या १० मिनिटांतच रेशनकार्ड मिळवून दिले!
Ashok PawarSarkarnama

शिरूर (जि. पुणे ) : शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात विमनस्क स्थितीत फिरणाऱ्या आणि रेशनकार्डसाठी हेलपाटे मारून कंटाळलेल्या महिलेची एका बाजूने आस्थेने विचारपूस करीत आणि दिलासा देत आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांनी दुसऱ्या बाजूला पुरवठा विभागाला गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) चांगलेच धारेवर धरले. नवीन रेशनकार्डसाठी चार महिने हेलपाटे मारणाऱ्या या महिलेच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार पवार उभे राहिल्याने दहाच मिनिटांत तिच्या हातात नवीन रेशनकार्ड पडले. (MLA Ashok Pawar issued a new ration card to the woman in just ten minutes)

आमदार ॲड. पवार हे आज काही कामानिमित्ताने तहसील कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते होते. त्यावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या एका बाजूला बाकड्यावर एक महिला विमनस्क स्थितीत बसल्याचे आमदार पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. त्यांनी तातडीने त्या महिलेच्या जवळ जात ‘कुठल्या कामासाठी आल्या आहात’, असे विचारले असता, टचकन डोळ्यांत पाणी आलेल्या त्या महिलेने पदराने अश्रू टिपत ‘चार महिन्यांपासून नवीन रेशनकार्डसाठी हेलपाटे मारीत आहे. पण ते मिळत नाही', अशी व्यथा मांडताच आमदार पवार यांनी त्यांना दिलासा दिला. आमदारांना ओळखतही नसलेल्या या महिलेने, रेशनकार्डसाठी दीड हजार रूपये दिल्याचे सांगितल्यावर मात्र आमदार पवार यांच्या रागाचा पारा चढला. पण तशाही स्थितीत संयम राखत,‘ताई तुम्ही पाणी प्या, चहा घ्या आणि घरी जा, तुमच्या घरी आजच्या आज रेशनकार्ड आणि तुम्ही त्यासाठी दिलेले दीड हजार रूपये पोच होतील’, अशा शब्दांत आश्‍वासित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेकडे आपला मोर्चा वळविला.

Ashok Pawar
मी पवारांचा माणूस हा माझ्यावर ठपका; पण...

आमदार पवार यांनी तातडीने तहसीलदार लैला शेख यांना ही बाब कळवून या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याचे आदेश दिले. त्यांनी पुरवठा कार्यालयातील अव्वल कारकून गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, केशरी रेशनकार्ड संपले असल्याने रेशनकार्ड देण्यास विलंब झाल्याचे सांगितल्यावर आमदार पवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती माने यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांनी फोन न उचलल्याने आमदारांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. आमदारांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आमदारांच्या विषयाबाबत अवगत केले व आमदारांशी तातडीने संपर्क साधण्यास फर्मावले.

Ashok Pawar
‘आमदार जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर प्रसिद्धीसाठी हल्ला केला’

काही वेळानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आमदारांना फोन आला व "तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडून केशरी रेशनकार्ड हवे असल्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे', त्यांनी कळविल्यानंतर आमदार पवार यांनी महसूल, पुरवठा विभागातील खालपासून वरपर्यंत सर्वांनाच फैलावर घेतले. आमदारांनी कठोर शब्दांत कानउघाडणी केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत नवीन रेशनकार्ड संबंधित महिलेच्या हातात पडले. या रेशनकार्डसाठी संबंधित महिलेकडून दीड हजार रूपये घेतलेल्या, एका मोठ्या संघटनेच्या तालुकाध्यक्ष असलेल्या महिला एजंटशीही आमदारांनी तातडीने संपर्क साधून ‘घेतलेले पैसे परत करा, अन्यथा...' असा सज्जड दम दिला. त्यासाठी मंत्री असलेल्या त्या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाशीही संपर्क साधला. गेली चार महिने हेलपाटे मारूनही नवीन रेशनकार्ड मिळत नसल्याने विमनस्क झालेल्या बालिका सूर्यकांत निकम (रा. करडे, ता. शिरूर) या नवीन रेशनकार्ड घेऊन घराकडे निघाल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू तरळले....

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in