
Pimpri-Chinchwad News : आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि, जालना) येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता.९) उस्फूर्त बंद पाळण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी झालेल्या निषेध सभेत 'एमआयएम'च्या (MIM) महिला शहराध्यक्षा रुहीनाज शेख यांचे भाषण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. तसेच त्यांच्या हुषारीमुळे या सभेला व पर्यायाने बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्नही फसला.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये एमआयएमही सहभागी होती. त्यामुळे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते निघालेल्या निषेध मोर्चात व नंतर पिंपरी चौकात झालेल्या निषेध सभेत सहभागी झाले होते. त्यात त्यांच्या कट्टर शिवभक्त तरुण महिला शहराध्यक्षा रुहीनाज यांनी भगवा फेटा बांधलेला असल्याने त्या व्यासपीठावर उठून दिसत होत्या. सभेपूर्वी आंतरवालीतील लाठीमाराचा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. त्यात रुहीनाज सामील झाल्या होत्या. नंतर पिंपरी चौकात झालेल्या निषेध सभेत, तर त्यांनी भाषणच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) आपली भावना समजावी म्हणून हिंदीतूनही त्या बोलल्या.
'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'तुमंच आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय' अशा घोषणा देतच रुहीनाज यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली. त्यावर उपस्थितांतील काही जणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. रुहीनाज यांच्याकडून अल्ला हो अकबरसारखी घोषणा होईल, असे जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांच्या अंदाज होत. दरम्यान, यामुळे व्यासपीठावर काही वेळ शांतता पसरली होती. पण, रुहीनाज यांनी हुषारी आणि प्रसंगावधानता दाखवित जय शिवराय असे एकदा नाही, तर दोनदा उत्तर दिले. तसेच घोषणा देणारे हे आपले बांधवच असल्याचे सांगत त्यांची बोलतीच बंद केली. दरम्यान, आपला डाव फसल्याचे लक्षात येताच जय श्रीरामच्या घोषणा देणारे शांत झाले.
मोदीसाहेबांपर्यंत माझा आवाज पोचला पाहिजे, असे सांगत रुहीनाज यांनी मराठीनंतर हिंदीत भाषण केले. तुम्ही कितीही हिंदी विरुद्ध मुस्लिम करा, लढवायचा प्रयत्न करा, त्यासाठी कितीही बंदे इथे पाठवा, पण आम्ही लढणार नाही. मराठी आरक्षणावरच ठाम राहणार असे त्या म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत त्यांनी मराठी बांधवांसोबत राहणार असे सांगितले. आंतरवालीत आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबाही दिला. जय जिजाऊ, जय शिवराय असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
दरम्यान, यासंदर्भात रुहीनाज यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता जय श्रीरामच्या घोषणा देणारे हे भिडेगुरुजींचे कार्यकर्ते होते, असे त्यांनी सांगितले. जय श्रीरामच्या घोषणेवर अल्ला हो अकबरसारखी घोषणा वा उलट उत्तर माझ्याकडून घेऊन त्यांचा सभेला व बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न होता. पण, मी जय शिवराय अशा उलट घोषणा देऊन तो हाणून पाडला, असेही त्या म्हणाल्या.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.