भुजबळ-वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Maratha Kranti Morcha demands resignation of Bhujbal-Vadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

भुजबळ-वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत. मराठाद्रोही लोकांना दूर सारावे.

पुणे : मराठा आरक्षणाबाबत पक्षपाती भूमिका घेत मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ मोडणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) तसेच बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vdettivar) यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे करण्यात आली.(Maratha Kranti Morcha demands resignation of Bhujbal-Vadettiwar) 

राज्य सरकारने नव्याने नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे बहुतांश सदस्य मराठाद्रोही आहेत. त्यामुळे हा आयोग बरखास्त करून नवा कायदेशीर आयोग नेमावा, अशी मागणीदेखील राज्यपालांकडे करण्यात आली.या दोन्ही मागण्यांचे निवेदन क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यपालांना देण्यात आले आहे. मंत्री भुजबळ व वडेट्टीवार यांनी मंत्री म्हणून एका विशिष्ट समाजाची बाजू घेत मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा आधिकार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. 

सवोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यात पुन्हा एकदा मागासवर्ग आयोग नेमला आहे. या आयोगाकडून मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्याने न्यायालयात मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे. मात्र, या कामासाठी नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही मराठा समाजाचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे हा आयोग मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वस्तुनिष्ठ काम करण्याची शक्यता नाही. त्यासाठी नव्याने नेमलेला आयोग बरखास्त करण्यात यावा तसेच यानंतर नेमण्यात येणाऱ्या नव्या आयोगावर मराठा समाजातील सदस्यांचा समोश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.मराठाद्रोही लोकांना दूर सारावे व मराठा समाजाला लवकर आरक्षण कसे मिळेल याचा विचार करून तातडीने तशी कृती करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.  

Edited By : Umesh Ghongade
  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख