महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एकाच छत्रीखाली.... लांडगे यांचा सूचक इशारा?
waghere-landage-ff

महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एकाच छत्रीखाली.... लांडगे यांचा सूचक इशारा?

राजकारणात कधी काहीही घडू शकतं....

पुणे : राजकारणात टायमिंगला महत्त्व असते. राजकीय नेता कोणत्या वेळी कोणती काॅमेंट करतो, त्यावरून बरीच मंडळी आडाखे मांडत असतात. आता असेच टायमिंग जुळवून आणले आहे ते भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी. त्यांनी असा फोटो शेअर केला आहे की त्याचे राजकीय अर्थ अनेक निघू शकतात. हा फोटो चार दिवसांपूर्वीचा आहे आणि त्यानंतर झालेल्य घडामोडींतून या फोटोकडे पाहिल्यास समझनेवालों का इशारा, असे म्हणता येते. 

महेश लांडगे यांनी आपल्या भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे काल पाठवून दिला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचा गट, तसेच जुन्या नेत्यांचा वेगळेच म्हणणे यांच्यात ओढाताण होत असल्याने हे पदच आपल्याला नको, अशी भूमिका लांडगे यांनी घेतल्याचे समजते आहे. पक्ष त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लांडगे यांची चर्चा आहे. त्यानंतर भाजपमधील नाराजीनाट्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

राजीनाम्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वत: लांडगे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांनी चार दिवसांपूर्वीचपिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सूचक फोटो वापरला आहे. लांडगे आणि वाघेरे हे एकाच छत्रीत पावसात भिजत असतानाचा तो फोटो आहे. हा फोटो आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहिल्यानंतर साहजिकच लांडगे यांना काहीतरी सुचवायचे तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. आपले शेलारमामा म्हणून लांडगे यांनी वाघेरे यांचे कौतुक केले आहे. त्यामुळेच हे दोघे एकाच छत्रीखाली भिजणार की एकाच राजकीय पक्षाच्या छत्राखाली ते येणार, याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणायची आहे. त्यासाठी भाजपमधील मोठा गट त्यांना फोडावा लागणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार लांडगे हे आधी अजितदादांच्या जवळचे होते. मात्र लक्ष्मण जगताप यांचे आणि अजितदादांचे सध्या फारसे सख्य नसल्याचे बोलले जाते आहे. पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये जगताप यांनी मदत केली नसल्याचे अजितदादांना वाटते आहे. त्यामुळेच जगताप यांच्याऐवजी इतर कोणाला अजित पवार जवळ करणार का, यावरही विविध अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी काळात घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दोघे एकत्र पावसात भिजत असतानाचे अर्थ निघू लागले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असताना हे मतभेद भाजपची डोकेदुखी वाढविणारे आहेत. त्यात हा फोटो तर  डोक्यावर आणखी बाम चोऴावा, असा आहे. 

Related Stories

No stories found.