लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिस ठाणी पुणे शहर हद्दीत येण्यास अद्याप प्रतिक्षा - loni kalbhor and lonikand police stations included in Pune city police limit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिस ठाणी पुणे शहर हद्दीत येण्यास अद्याप प्रतिक्षा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

लोणीकंद झोन 4 मध्ये, तर लोणी काळभोरचा झोन 5 मध्ये समावेश 

पुणे ः पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलिस ठाण्यांचा पुणे पोलिस आयुक्तालयात अखेर समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुणे पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावाला गृह विभागाने ग्रीन सिग्नल दिला. त्याबाबतची अधिसूचना सोमवारी काढण्यात आली. असे असले तरी अद्याप ही ठाणी शहर हद्दीत वर्ग करण्याची परवानगी नसल्याने त्याची अंमलबजावणी होण्यास आणखी काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

या प्रस्तावाला शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विरोध केला होता. ही दोन्ही पोलिस ठाणी ग्रामीणमध्येच ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण सरकारने त्यांचा समावेश पुणे शहराच्या हद्दीत केला. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून महत्त्वाची पोलिस ठाणी कालांतराने कमी होतील. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीवेळी ग्रामीण पोलिस दलामध्ये असलेल्या लोणी काळभोर, लोणीकंद व हवेली या पोलिस ठाण्यांचा पुणे पोलिस आयुक्तालयात समावेश करावा, याबाबतचा प्रस्ताव पुणे पोलिस आयुक्तालयातून राज्याच्या गृह विभागामध्ये पाठविण्यात आला होता. मात्र मागील अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला जात होता. मात्र त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर गृह विभागाचे तत्कालीन विशेष पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळलेले व सध्या पुणे पोलिस आयुक्त असलेल्या अमिताभ गुप्ता यांनी यासंबंधीचे सर्व प्रस्ताव तपासले. त्याचा पुन्हा एकदा पाठपुरावा केला. त्यानंतर एका महिन्यातच दोन्ही पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा आदेश गृह विभागाकडून सोमवारी काढण्यात आला. पण त्याची अंमलबजावणी लगेच होणार नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.  

लोणीकंद झोन 4 मध्ये, तर लोणी काळभोरचा झोन 5 मध्ये समावेश 
लोणीकंद पोलिस ठाणे परिमंडळ 4 व सहायक पोलिस आयुक्त, येरवडा विभागाला आणि लोणी काळभोर पोलिस ठाणे परिमंडळ 5 सहायक पोलिस आयुक्त, हडपसर विभागाला जोडण्यात आले आहे. आवश्‍यक कर्मचारी व गुन्ह्यांचे आदानप्रदान प्रक्रिया येत्या 2 ते 4 दिवसात पूर्ण करून एक नोव्हेंबरपासून ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलात समाविष्ट केली जाणार आहेत. सध्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एक वरीष्ठ पोलिस निरीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार पोलिस उपनिरीक्षक असे दहा अधिकारी तर साठ पोलिस कर्मचारी आहेत. तर लोणीकंद पोलिस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक असे सात अधिकारी व अठ्ठावन्न पोलिस कर्मचारी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख