Kasaba By-Election : कसबा आम्ही जिंकूच; चंद्रकांतदादांचा विश्वास!

Kasaba By-Election : गिरीश बापटांनी हा मतदारसंघ बांधला आहे.
Kasaba By-Election
Kasaba By-ElectionSarkarnama

Kasaba By-Election : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, "महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, ""कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आमदार माधुरीताई मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजय काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

Kasaba By-Election
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

"कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना पाटील यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, "खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे."

मुळीक पुढे म्हणाले की, "सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते 'भारत जोडो' यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला."

आमदारमाधुरी मिसाळ म्हणाल्या की, "यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Kasaba By-Election
RTI मधून मागविलेल्या कागदपत्रांसाठी तलाठ्याने मागितली लाच अन् अडकला पोलिसांच्य जाळ्यात!

भाजपा उपाध्यक्ष संजय नाना काकडे म्हणाले की, "कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌," अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, "आज मोदींचे नेतृत्व जनसानसात रुजलेलं आहे . याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे," अशी सूचना त्यांनी यावेळी केली. बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com