भावकीच्या हक्काने अजितदादांना काम सांगणारे दशरथ पवार यांचे निधन 

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते दशरथ मारुती पवार (वय 67) यांचे शनिवारी (ता. 8 ऑगस्ट) सकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.
Former Junnar Panchayat Samiti chairman Dashrath Pawar dies due to corona
Former Junnar Panchayat Samiti chairman Dashrath Pawar dies due to corona

जुन्नर : (जि. पुणे) : जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते दशरथ मारुती पवार (वय 67) यांचे शनिवारी (ता. 8 ऑगस्ट) सकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. 

कोरोना विषाणूची बाधा झाल्याने दशरथ पवार यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांना मधुमेह, रक्तदाब आदीही आजार होते. 

जुन्नर तालुक्‍यातील विविध विकास कामांचा दशरथ पवार सतत पाठपुरावा करायचे. विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ते निधीसाठी आग्रह धरत असत. अजितदादा जुन्नरला आले की आमची भावकी कोठे आहे? अशी आवर्जून आस्थेवाईकपणे विचारपूस करायचे. दशरथ पवार देखील तितक्‍याच दिमाखात दादांना दाद देत मागणीचे निवेदन पुढे करत असत. त्यावर आता भावकीची मागणी आहे, म्हणजे ती पूर्ण करावीच लागणार, असे उत्तर अजित पवार देत असत. 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार जुन्नर तालुका पंचायत समितीचे 1992-97 सलग पाच वर्षे ते सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार जुन्नरला मिळाला होता. इयत्ता चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम त्यांनी तालुक्‍यात राबविला होता. हाच कार्यक्रम नंतर जिल्ह्यात राबविला गेला. 

पंचायत समितीचे सभापती पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत गावभेट कार्यक्रमातून गावचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले होते. जुन्नर तालुक्‍यात त्यांच्या काळात अनेक बंधारे बांधण्यात आले. त्याचा आज तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पारुंडे हे त्यांचे मूळ गाव होते. तेथे भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. 

गावची निवडणूक बिनविरोधाचा प्रयत्न करत असत, त्यातून गावात एकोपा राखल जावा, असा त्यांचा हेतू असायचा. पारुडे तंटामुक्त गाव समितीचे ते अध्यक्ष होते. सर्वसामान्य कार्यकर्ता ते सभापती, प्रगतिशील शेतकरी म्हणून ते परिचित होते.

जुन्नर येथील शिवाजी मराठा शिक्षण संस्था, क्रांती गणेश मंडळ यांच्याशी त्यांचा जवळून संबंध होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार वल्लभ बेनके यांचे कट्टर समर्थक म्हणून दशरथ पवार यांची जुन्नर तालुक्‍यात ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जुन्नर तालुक्‍यात शोककळा पसरली होती. 

Edited By Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com