शरद पवारांच्या नेतृत्वाची जयवंतराव जगतापांना पुन्हा भुरळ!

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग (बारामती) येथे जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्यात विशेषतः करमाळा तालुक्‍यात राजकीय चर्चा रंगली आहे. माजी आमदार जगताप यांनी नेमकी ही भेट कशासाठी घेतली? जगताप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत काय? याविषयी तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
Jayawantrao Jagtap was again impressed by Sharad Pawar's leadership
Jayawantrao Jagtap was again impressed by Sharad Pawar's leadership

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग (बारामती) येथे जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे सोलापूर जिल्ह्यात विशेषतः करमाळा तालुक्‍यात राजकीय चर्चा रंगली आहे. माजी आमदार जगताप यांनी नेमकी ही भेट कशासाठी घेतली? जगताप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत काय? याविषयी तर्क वितर्कांना उधाण आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ म्हणून ओळख असणारे माजी आमदार (कै.) नामदेवराव जगताप यांचे जयवंतराव हे चिरंजीव आहेत. जयवंतराव जगताप हे 1990 मध्ये प्रथम अपक्ष आमदार झाले. त्यानंतर ते 1995, 1999 मध्ये कॉंग्रेसकडून लढले. सन 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक होते. पण, 1999 मध्ये जगताप यांच्याऐवजी नारायणआबा पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. कॉंग्रेसकडून दोन वेळा लढूनही पराभव पदरी आल्याने ते 2004 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढले आणि निवडून आले. त्या वेळी त्यांनी माजी राज्यमंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांचा पराभव केला होता. 

लोकसभेला भाजपचा प्रचार 

त्यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणूक ते चक्क समाजवादी पक्षाकडून, तर 2014 मध्ये ते पुन्हा कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभा लढले. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता. या वेळी त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला होता, त्यामुळे पवार-जगताप भेटीला विशेष महत्त्व आहे. 

करमाळा राष्ट्रवादीत पोकळी 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. तर "राष्ट्रवादी'कडून लोकसभा लढलेले संजय शिंदे यांनी विधानसभा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांनाही उमेदवारीसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांनीही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. परिणामी, करमाळ्यात राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळू शकला नाही. 

बागल यांच्याकडूनही गाठीभेटी 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल हे साखर कारखान्यांच्या अडचणींसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटत आहेत. बागलही पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. करमाळा तालुक्‍यात सध्या राष्ट्रवादीकडे एकही बडा नेता नाही, त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी जयवंतराव जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार की काय? अशी चर्चा रंगली आहे. 

संजय शिंदे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेत जयवंतराव जगताप यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर 307 चा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामिनासाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदे यांचा प्रचार केला. संजय शिंदे आज राष्ट्रवादीत नसले तरी त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत. शिवाय करमाळ्याच्या राजकारणात आमदार शिंदे हे जगतापांना कायम सोबत घेत आले आहेत. त्यामुळेच जगताप यांनी शरद पवार यांनी घेतलेली भेट विशेष महत्त्वाची आहे. 

पवारांवरील श्रद्धा तसूभरही कमी झालेली नव्हती 

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माझे भावनिक नाते आहे. ते मला पितृतुल्य आहेत. त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. नामदेवराव जगताप साहेबांपासून पवार साहेबांचे व आमचे ऋणानुबंध आहेत. तालुक्‍यासह जिल्ह्याच्या राजकीय व विकासात्मक बाबींवर चर्चा झाली. भविष्यात कृतीतूनच त्याचे रिझल्ट दिसतील. मधल्या काळात काही स्थानिक राजकीय मतभिन्नतेमुळे मी त्यांच्यापासून दूर झालो असलो तरी भावनिक व वैचारीकदृष्ट्या आम्ही कधीच विभक्त झालो नव्हतो. त्यांच्यावरील माझी श्रद्धा व त्यांचेही माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही वा होण्याचे काही कारण नाही.

तालुक्‍याच्या विकासाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ठामपणे पाठीशी राहण्याबाबत त्यांनी अश्वस्त केले. पवारसाहेबांच्या भेटीत तालुक्‍याच्या घडामोडींवर चर्चा झाली. माझे वडील (कै.) नामदेवराव जगताप यांच्यापासून पवारसाहेबांचे आणि आमचे संबंध आहेत. पवारसाहेब, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आजही आहे. यापुढेही त्यांच्याच विचाराने राजकारण करणार आहे, असे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com