निकालाआधीच जयंत पाटलांनी पराभव मान्य केलाय : फडणवीस - jayant patil concedes defeat before result says fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

निकालाआधीच जयंत पाटलांनी पराभव मान्य केलाय : फडणवीस

उमेश घोंगडे
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

ज्यांनी चुकीचे काम केलेले नाही. त्यांनी कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे कारण नाही- फडणवीस 

पुणे : निवडणूक निकाल लागण्याआधीच मतदार यादीबाबत आक्षेप घेण्यास सुरवात केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पराभव मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. पाटील यांना पराभव दिसत असल्याने त्यांनी पराभवाची कारणे शोधली आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.

पदवीधर मतदारंघातील नाव नोंदणीत बोगस नोंदणी झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, "एक वर्ष पूर्ण होत आले तरी हे सरकार जुने निर्णय रद्द करण्यापलिकडे किंवा त्या निर्णयांचा फेरविचार करण्यापलिकडे काहीही करू शकले नाही. कोरोनाचा सामना करण्यात हे सरकार कमी पडले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. मात्र, शेतकऱ्यांना हे सरकार कोणतींही मदत करू शकले नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये या सरकारविषयी असंतोष आहे.''

केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातल्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय या आरोपाचे खंडन करताना फडणवीस म्हणाले, "ज्यांनी चुकीचे काम केलेले नाही. त्यांनी कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. गैरप्रकारात अडकलेल्या भाजपाच्या शंभर जणांची यादी देण्याचे आव्हान मी राऊत यांना दिले होते. विधान परिषद निवडणुकीनंतर ते यादी देणार आहेत. त्यांच्या यादीची मी वाट पाहात आहे. वीज बिलांच्या प्रश्‍नावरदेखील राज्य सरकारची भूमिका सामान्य माणासला नाडणारी आहे. सर्वसामान्य ग्राहकाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे सरकारचे काम आहे. मात्र, राज्यातल्या सरकारला जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुळात सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी या सरकारकडे वेळच नाही. ''

जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष सोडला असला तरी भाजपाने त्यांना खूप काही दिले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात काम करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. मात्र, राजकीय दृष्टीकोनातून कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. काही लोक समाधानी राहात नाहीत, असे त्यांनी म्हटले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख