शेरेबाजीत वेळ घालवण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी पुण्यातले रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत

पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. पण, गेली साडेचार वर्षे शहरातील मोठे प्रकल्प मात्र रखडले आहेत.
mohan joshi.jpg
mohan joshi.jpg

पुणे : अन्य पक्षाच्या नेत्यांबद्दल उथळपणे शेरेबाजी करण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे. Instead of wasting time on gossip, Chandrakant Patil should get rid of the stalled projects in Pune)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी बोलताना नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत, अशी टीका केली होती. त्याचा समाचार घेताना मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. पण, गेली साडेचार वर्षे शहरातील मोठे प्रकल्प मात्र रखडले आहेत. भाजपा ते मार्गी लावू शकलेले नाही.

मुठा नदी सुधारणेसाठी ८०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा सहा वर्षांपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी केली होती. जावडेकर यांचे मंत्रिपद गेले पण, योजना अद्याप मार्गी लागली नाही. जावडेकर फक्त घोषणा करुन थांबले. स्मार्ट सिटी योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातच केली.

पाच वर्षात योजनेचा पहिला टप्पाही भाजपाला पूर्ण करता आला नाही. उलट, योजना गुंडाळण्याच्या तयारीतच मोदी सरकार आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या घोषणा झाल्या, त्या योजनेबाबतही वेळकाढूपणा चालला आहे. पुणे मेट्रोकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या योजनेचे काम लांबले. शहर विकासाकडे भाजपचे एवढे दुर्लक्ष झाले असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र शेरेबाजीत रमले आहेत, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने पुण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीचे जादा डोस देण्याची तयारी दाखविली होती. त्याला केंद्र सरकारची परवानगी आवश्यक होती. त्याबाबतही दोन महिने उलटून गेले तरी खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ ती परवानगी मिळवू शकले नाहीत. पुणेकरांनी भाजपला शंभर नगरसेवक, सहा आमदार, सलग दोन वेळा खासदारकी एवढे भरभरून दिले, त्या बदल्यात भाजपाने पुणेकरांना काय दिले ? याचा शोध आणि त्यातून काही बोध चंद्रकांत पाटील यांनी घ्यावा, असेही माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com