
पुणे : कोरोना काळात दिवसरात्र काम करून महापौर म्हणून लोकांच्या पुणेकरांच्या मनात वसलेल्या मुरलीधर मोहोळ यांना लोक आजही महापौर मानत आहेत. मात्र, आम्ही त्यांना कायम महापौर म्हणून ठेवणार नाही. मोहोळ यांना त्याच्याही वरची आणखी संधी मिळेल, असे स्पष्ट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांच्या ‘राजकीय प्रमोशन’चा थेट उल्लेख केला. फडणवीस यांनी जाही केलेल्या या भूमिकेमुळे माजी महापौर मोहोळ यांना भविष्यात मोठी राजकीय जबादारी मिळणार हे आता निश्चित झाले आहे.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात फडणवीस यांनी मोहोळ यांच्या ‘राजकीय प्रमोशन’चे सूतोवाच केले. फडणवीस म्हणाले, ‘‘ कोरोना संकटाच्या काळात मोहोळ यांनी महापौर या नात्याने केलेले काम पुणेकरांच्या लक्षात आहे. त्यामुळे पुणेकर आजही त्यांना महापौर मानत आहेत. मात्र, या पदावर त्यांना आम्ही फार काळ ठेवणार नाही. या पदाच्या वरची संधी त्यांना मिळेल.’’
फडणवीस यांनी केलेल्या या थेट उल्लेखाने येत्या काळात माजी महापौर मोहोळ यांना कोणते राजकीय पद मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपदाच्या काळात मोहोळ यांनी चांगले काम केले. विशेषत: कोरोना संकटाच्या काळात ते दिवसरात्र काम करीत होते. कोणत्याही मदतीसाठी ते सदासर्वकाळ सर्वांना उपलब्ध होते. त्यामुळे मोहोळ यांची प्रतिमा संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक मतदारापर्यंत पोचली आहे.त्याचाच उल्लेख या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी केला. तोच धागा पकडून फडणवीस यांनी मोहोळांच्या ‘राजकीय प्रमोशन’चा थेट उल्लेख केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील आपल्या भाषणात मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले. मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाच्या काळात केलेले काम पुणेकर अजूनही विसरलेले नाहीत. त्यांच्या कामची धडाडी कायम असते, या शब्दात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मोहोळ यांच्या पाठवर कौतुकाची थाप मारली. मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून कोथरूड संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. मात्र, यावर्षी मोठ्या उत्साहात महोत्सव साजरा करण्यात येत असून अनेक मोठ्या कलाकारांची उपस्थिती हे या महोत्सवाचे आकर्षण आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.