होय बाबा, मी आता ड्रायव्हर म्हणून बसतो : अजितदादांची टोलेबाजी!

आम्हीही सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली साहेब, तेव्हा तर तुम्ही झोपला होता. पहाटे पाचला तर अंधार असतो नाही तर पाचला कामाला सुरुवात करतो.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnana

बारामती : बारामती तालुक्यातील विकासाबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी, अशी मागणी एका कार्यकर्त्याने केली. तोच धागा पकडत अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. ‘होय बाबा, सगळी सोय करायची आहे. आता मी ड्रायव्हर म्हणून बसतो, शरद पवारसाहेबांना (sharad pawar) कंडक्टर करतो आणि सुप्रियाला (supriya sule) म्हणतो तू तिकीट काढ. असे काही करू नका. पूर्वीचा काळ आठवा. आपल्यादेखील काहीतरी बदल करावा,’ असे भाष्य उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी केले. (I now sit as a driver: Ajitdada Pawar)

बारामती तालुक्यातील भिलारवाडी येथील तलावातील गाळ उपसण्याच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नाम फाउंडेशनचे समन्वयक आणि नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ajit Pawar
'ZP अध्यक्ष असताना जेवढं काम केलं, तेवढं चांगलं काम मंत्री असूनही करू शकलो नाही!'

अजित पवार म्हणाले की, मुलांना शाळेत जाण्यासाठी पूर्वी काय परिस्थिती होती. तुम्हीही काहीतरी सहन करा ना. तुम्ही गाववाल्यांनी एखादी गाडी सुरू करावी. आपल्या गावातील मुलं-मुली त्या गाडीतून शाळेत पोचविण्याचा प्रयत्न करावा. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जेवणाचा डबा बारामतीतून पुण्याला जायचा. एसटीतून जाण्यासाठी त्याला चार तास लागायचे. कधी कधी डब्यातील भाजी विटायची, तरीदेखील त्यांनी चटणी भाकर खात दिवस काढले. तेव्हा पवारसाहेब आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचले आहेत. इथं आम्हाला चार किलोमीटरपर्यंत जायचं म्हटलं तरी गाडीची सोय केली पाहिजे, अशी मागणी होते. उद्या पेपरही तुम्हीच लिहून द्या, आम्ही फक्त तेथे येतो, असं म्हटलं जाईल. म्हणतात ना ते जांभळाच्या झाडाखाली बसायचं आणि जांभूळ थेट थोबाडात (तोंडात) गेले पाहिजे. ते खाली नाही पडलं पाहिजे. कारण खाली पडलं तर ते उचलून तोंडून टाकायचा आळशीपणा करायचा. हे काही बरोबर नाही, अशा शब्दांत पवारांनी सुनावले.

Ajit Pawar
पोलिस दलात मोठी खांदेपालट : नम्रता पाटील, मिलिंद मोहितेंसह ७८ अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या

पवारसाहेब आज ८२ वर्षांचे असतानाही सर्वत्र फिरतात, कामं करत आहेत. लोकांना सल्ला देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. काय तुमचं भलं आहे, ते सांगत आहेत. आम्हीही तेच करतो. आम्हीही सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली साहेब, तेव्हा तर तुम्ही झोपला होता. पहाटे पाचला तर अंधार असतो नाही तर पाचला कामाला सुरुवात करतो. या सर्वाचा विचार करा. खूप साऱ्या सुविधा केल्या ना त्याची किमत राहत नाही. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. अजूनही बदल झाले पाहिजेत, याबाबत दुमत नाही. पण प्रश्न सुटत असतात, काही प्रलंबित राहतात. प्रश्न सुटण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
सोलापूरकरांनो, गैरसमज करून घेऊ नका; ‘ती’ योजना जुनीच : भरणे

भिलारवाडीत आज १ कोटी ३२ लाखांचे काम होत आहे. आपण शब्द टाकला आणि सीरमकडून या काामासाठी निधी मिळाला. त्यांना काय पडलं होतं, या कामाचं. पण आपले प्रयत्न सुरू असतात. एकाच आईबापाच्या पेाटी जन्मलेले सख्खे भाऊ बांधावरून एकमेकांना कुऱ्हाड घेऊन हाणायला निघतात, असा चिमटाही बांधावरून भांडणाऱ्याला त्यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com