फडणवीस यांना केलेल्या एका मेसेजने माझी पंतप्रधान मोदींशी भेट झाली - I met Prime Minister Modi with a message to Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस यांना केलेल्या एका मेसेजने माझी पंतप्रधान मोदींशी भेट झाली

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

माझ्या आयुष्यातील तो सुवर्णक्षण होता,अशी आठवण नगरसेवक धीरज घाटे यांनी सांगितली.

पुणे : पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पुण्यातला पहिला दौरा होता. या दौऱ्यात पुण्यातल्या भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी विमानतळावर भेटणार होते. माझ्यावर राजकीय स्वरूपाचे अनेक गुन्हे असल्याने पुणे पोलिसांनी माझ्या नावाला आक्षेप घेतला होता. मात्र, ही अडचण मी फडणवीस यांना एक मेसेज करून कळविली. माझ्या एका मेसेजची दखल घेत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटणाऱ्या सदस्यांच्या यादीत माझे अंतीम केले. माझ्या आयुष्यातील तो सुवर्णक्षण होता, अशी आठवण नगरसेवक धीरज घाटे यांनी सांगितली.

कार्यकर्त्यांशी वैयक्तिक नातं जपणारे नेते ही फडणवीस यांची ओळख अशा प्रसंगातून अधिक ठळकपणे पुढे येते. गेल्या वीस-बावीस वर्षात फडणवीस यांच्याशी अनेकवेळा संपर्क आला.त्यांच्याशी असलेल्या कोणत्याही कामासाठी एक मेसेज पुरेसा असतो.केवळ एका मेसेजवर अनेक कामे त्यांनी मार्गी लावल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील, असे घाटे यांनी सांगितले. घाटे हे विद्यमान नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेत सभागृह नेते म्हणून त्यांनी काम केले आहे. प्रदेश भाजपाचे चिटणीस व पुण्याचे प्रभारी अशी त्यांच्यावर जबाबदारी आहे.फडणवीस यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्ताने घाटे यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. 

घाटे म्हणाले, ‘‘ फडणवीस यांना पुण्याविषयी विशेष आस्था आहे. पुण्यातल्या मेट्रोसह विकासाच्या विविध प्रश्‍नावर त्यांचे कायम लक्ष असते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी पुण्याचे प्रश्‍न प्राधान्याने मार्गी लावले.फडणवीस यांच्यामुळे पुण्यात सध्या एकाचवेळी विविध प्रकल्प सुरू आहेत.पुण्यात मेट्रो भुयारी असावी की नको यावर आधीच्या सरकारने अनेक वर्षे वाया घालवली होती. मात्र, फडणवीस यांनी हा प्रश्‍न निकाली काढून मेट्रोच्या कामाला सुरवात करून दिली.कामाची धडाडी, निर्णय घेण्यातील तत्परता, संयम व सतत कार्यकर्त्यांशी संपर्क हे त्यांचे विशेष गुण आहेत.’’

मुख्यमंत्री म्हणून काम करताना फडणवीस यांनी मोठी धडाडी दाखविली आहे.अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख आहे. मात्र, ते तितकेच आक्रमकदेखील आहेत. मुख्यमंत्री होण्याआधी त्यांनी विधानसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आणि आक्रमक  कामगिरी महाराष्ट्र विसरणार नाही.पुण्यात गेली चार वर्षे भाजपा महापालिकेत सत्तेत आहे.चार वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा विश्‍वास असून पुन्हा सत्तेत येऊन फडणवीस यांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू, असे घाटे यांनी सांगितले.राज्यातील राजकीय परिस्थिती बदलेल आणि फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्‍वास घाटे यांनी व्यक्त केला. 
  Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख