`मी अजित पवारांना 2019 पासून भेटलेलो नाही....` - I have not met ajit pawar since 2019 says bapu pathare | Politics Marathi News - Sarkarnama

`मी अजित पवारांना 2019 पासून भेटलेलो नाही....`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

पुण्यात राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग... 

पुणे : पुणे शहर भाजपमधील अनेक नेते, नगरसेवक हे संशयाच्या फेऱ्यात असून अनेक जण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेने किंवा अफवेने या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. महापालिका निवडणुकीच्या वर्षभर आधीच पक्षफुटीचा विषय सुरू झाल्याने अनेकांना त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.

भाजपचे पुण्यातील 19 नगरसेवक हे सोडून जाणार असल्याच्या शक्यतेचा धुरळा खाली बसण्याच्या आधीच माजी आमदार बापूसाहेब पठारे हे सुद्धा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त झळकले. काही माध्यमांनी पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत घेण्याची विनंती केल्याचे प्रसिद्ध केले. अजितदादांनी वडगाव शेरीतील स्थानिक नेत्यांवर पठारेंच्या पक्षप्रवेशाचा निर्णय सोपविल्याचेही सांगण्यात आले. पठारे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दुपारी अजित पवार यांच्यासोबत प्रचारात असलेले पठारे यांनी त्याच रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. वडगाव शेरीतून राष्ट्रवादीने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यान ते नरााज असल्याची तेव्हा बोलले जात होते. वडगाव शेरीत राष्ट्रवादीचा आमदार झाला आणि राष्ट्रवादी राज्यात पुन्हा सत्तेवर आल्याने पठारे परत राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा मतदारसंघातही होती.

यावर पठारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीच्या संदर्भातील काही खोट्या, नागरिकांना संभ्रमात टाकणाऱ्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या आहेत. अजित पवार यांची पक्षप्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची भेट झाली नसून पक्षप्रवेश करण्यासंदर्भात २०१९ च्या निवडणुकीनंतर मी माननीय अजितदादांना एकदाही भेटलेलो नाही. मी यासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिकादेखील कोणाकडे मांडलेली नाही. विरोधकांकडून अशा प्रकारच्या मुद्दाम खोट्या, दिशाभूल करणाऱ्या अफवा, बातम्या प्रसारित करण्यात येत असून सदर माहिती ही खोटी असून मी माझ्या भूमिकेवर आजही ठाम आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे माझ्यावर अतिशय प्रेम व‌ विश्वास आहे. विरोधकांनी याची चांगलीच धास्ती घेतलेली सदर प्रकारावरून मला दिसते आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा व बातम्या नागरिकांना दिशाभूल करण्यासाठी विरोधक पसरवत असल्याचे मी स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

विरोधकांनी अशा खोट्या बातम्या पसरविण्यापेक्षा मी आमदार असताना केलेल्या कार्याचा आलेख पहावा आणि माहिती घ्यावी आणि किमान माझ्या कार्याची बरोबरी करण्यासाठी त्यांचा वेळ खर्च करावा. अशा अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे.

मी यापूर्वी देखील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहील. मी या बातम्यांचे खंडन करतो आणि मी माझ्या भूमिकेवर व माझ्या पक्षावर आजही ठाम आहे असे याठिकाणी निक्षून सांगतो. नागरिकांनी या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवांना बळी पडू नये, असे म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख