
पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) तथा केपी यांनी दीड वर्षाच्या कारकिर्दीत दोनशे कोटी रुपयांची वसूली केल्याचे पत्र ६ मे रोजी व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. त्या पत्रातील आरोपांचा केपींनी इन्कार केला आहे. दुसरीकडे,मात्र त्याबाबत राज्य सरकारने चौकशी सुरु केली असून काय कारवाई करायचे ते चौकशीअंती ठरवू, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. यामुळे केपींवर कारवाईची टांगती तलवार लटकलेलीच राहणार आहे. (Dilip Walse Patil Latest Marathi News)
एका खासगी कार्यक्रमासाठी गृहमंत्री शहरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. केपींचे रिडर तथा वाचक म्हणून काम केलेले एपीआय अशोक डोंगरे यांच्या नावाने हे पत्र व्हायरल झाले होते. त्यात तीन पत्रकार, तीन पीआय, चार एसीपी, काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याने मोठी खळबळ उडाली होती. आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी केपींनी या पत्रकारांना लाखो रुपये दिल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, डोंगरे यांनीही हे पत्र खोटे असल्याचा खुलासा केला. एवढेच नाही तर त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत विचारणा केली असता गृहमंत्र्यांनी चौकशीअंती काय कारवाई करायचे ते ठरवू, असे आज सांगितले.
राणा दांपत्य व त्यांच्या हनुमान चालिसा पठणाविषयी विचारले असता तो काही आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही, असे सांगत गृहमंत्र्यांनी त्यावर भाष्य केल्याचे टाळले. एखाद्या निष्पाप व्यक्तीला अटक झाली, तर ती करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे उत्तर त्यांनी आर्यन खान प्रकरणावर दिले. त्यामुळे ही कारवाई केलेले एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केंद्र सरकार निश्चीत कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारण तसे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांनी दिले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात न्यायालयाने शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला क्लिनचिट दिल्याने त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्याची नामुष्की एनसीबी तथा केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागावर आली.राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंचा हा फर्जीवाडा (घोटाळा) असल्याचा आरोप आर्यन खान प्रकरणावर केला होता. तो आता खरा ठरला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.