भाजप अन् मनसेचं हे ठरवून चाललंय! वळसे पाटलांची टीका

राज ठाकरेंनी पवारसाहेबांबद्दल बोलायचे आणि भाजपने शिवसेनेबद्दल बोलायचे हे त्यांनी वाटून घेतलेले असावे, असं वळसे पाटील म्हणाले.
भाजप अन् मनसेचं हे ठरवून चाललंय! वळसे पाटलांची टीका
Dilip Walse Patilsarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी औरंगाबादच्या सभेत केलेल्या भाषणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी टीका केली आहे. भाजप आणि मनसेकडून हे ठरवून चालले आहे. कुणी कुणावर बोलायचे हे दोघांनी वाटून घेतले आहे, असा निशाणा वळसे पाटील यांनी साधला.

पुण्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरेंनी पवारसाहेबांबद्दल बोलायचे आणि भाजपने शिवसेनेबद्दल बोलायचे हे त्यांनी वाटून घेतलेले असावे. पवारसाहेबांवर केलेली टीकेला फार महत्व देत नाही. पवारांचे राजकारण, समाजकारण देशाने पाहिले आहे. सर्व जाती-धर्माचे लोकांना सोबत घेऊन जातात. अशावेळी जातीवादाचा आरोप करणे, टीका करणे, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा कार्यक्रम नाही. आधीच्या सभांमध्येही याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले. हे ठरवून चालले आहे. यापाठीमागे कोणती तरी शक्ती जाणीवपूर्वक केले जात आहे.

Dilip Walse Patil
राज ठाकरेंवर कारवाई होणार? वळसे पाटलांनी दाखवलं पोलीस आयुक्तांकडं बोट

दोघांनी एकत्रितपणे येऊन राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. अशांतता निर्माण करून कायदा-सुव्यवस्था नाही, असा आरोप करायचा. जेम्स लेनच्या मुद्याला नव्याने तापवण्याची गरज नाही. राज्यातील प्रश्न महत्वाचे आहेत, त्यावर चर्चा व्हायला हवेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. देशाची आर्थिक स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सुपारी घेऊन कुणी प्रयत्न करत असेल तर बालीशपणा म्हणावे लागेल, असा टोलाही वळसे पाटील यांनी लगावला.

पोलीस आयुक्तांकडून भाषणाचा अभ्यास

राज ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा (Supreme Court) मोठे नाहीत, असं सांगत वळसे पाटील म्हणाले, त्यांच्या भाषणात काहीही वेगळं नव्हतं. केवळ भोंगे आणि पवारसाहेबांवर टीका होती. समाजासमाजात तेढ कशी निर्माण होईल, अशी प्रक्षोभक वक्तव्य पाहायला मिळाली. उद्या मुंबईला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादचे पोलीस आयुक्त त्याचा अभ्यास करत आहेत. कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाईल, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Dilip Walse Patil
राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर; प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होणार धरपकड?

कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन कुणीही करून चालणार नाही. त्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळा सोडून इतरवेळी भोंगे पोलिसांच्या परवानगीने लावावे. राज ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. मुस्लिम समाजाला समोर ठेवून त्यांनी जर काही भूमिका घेतली असेल तर त्याचा परिणाम केवळ मुस्लिम समाजावर होणार नाही. कीर्तने रात्री उशिरापर्यंत चालतात, काकड आरती पहाटे चार वाजता असते. जागरण-गोंधळ, गावागावत होणार तमाशे, भजन, कीर्तन, वारकरी संप्रदायावर त्याचा परिणाम होणार आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.