उद्योगांचे जाळे विस्तारल्याने 'या' शहराला पसंती   - The highest urbanization in Pune district | Politics Marathi News - Sarkarnama

उद्योगांचे जाळे विस्तारल्याने 'या' शहराला पसंती  

विक्रांत मते
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

देशात सर्वाधिक नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण वाढत असल्याचे ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या मोठ्या बांधकामांच्या प्रकल्प नोंदणीवरून स्पष्ट होत आहे.

नाशिक :  मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे या मुंबई पासून नजीक असलेल्या भागात सर्वाधिक बांधकामांची नोंद झाल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक नागरीकरणाचा पट्टा म्हणून उदयाला आला आहे. देशात सर्वाधिक नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण वाढत असल्याचे ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या मोठ्या बांधकामांच्या प्रकल्प नोंदणीवरून स्पष्ट होत आहे.

त्याखालोखाल मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात बांधकामांच्या प्रकल्पांची नोंदणी झाली आहे.  गेल्या दोन वर्षांत ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या प्रकल्पांवरून मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणासह मुंबई परिसरातील जिल्ह्यांमध्ये घरे खरेदीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात ऑटोमोबाईल सह माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांचे जाळे विस्तारल्याने व या कंपन्यांमध्ये अधिक वेतन असल्याने वाढलेल्या क्रयशक्तीतून या भागात घरे घरेदीकडे कल वाढला आहे. मुंबईमध्ये पूर्वीपासूनच घरांना मागणी आहे. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक सात महापालिका असल्याने येथे पूर्वीपासूनच नागरीकरण वाढत असल्याने त्यानुसार घरांना मागणी सातत्याने वाढतं आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या २,२१३ प्रकल्पांची नोंदणी आश्‍चर्यकारक वाटत असले तरी पनवेल, पेण, तळोजे, रसायनी, उरण या मुंबईला लागून असलेल्या भागातील उद्योगीकरणामुळे या भागात नागरीकरण वाढत आहे. ठाणे जिल्हा विभाजनातून निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील १,३५१ प्रकल्पांची नोंदणी झाली आहे.

अन्न, वस्त्र व निवारा या प्रमुख गरजांपैकी एक असलेले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. त्यामुळे घर घेणारा ग्राहक व घर बांधून देणारा बांधकाम व्यावसायिक या दोघांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण होण्यासाठी सरकारने ‘महारेरा’ ची स्थापना करण्यात आली. रो-हाऊस व बंगलो वगळता आठ फ्लॅटपेक्षा अधिक किंवा पाचशे मीटर पेक्षा अधिकच्या प्लॉटवर प्रकल्प उभा करताना ‘महारेरा’कडे (महाराष्ट्र रिअल ईस्टेट रेग्युलेटरी ऑथिरीटी) प्रकल्प नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

आल्हाददायक हवामानात राहण्यासाठी नाशिकला पसंती
मुंबई, पुणे व ठाणे भागात घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती, वाढते प्रदूषण, लोकसंख्येची दाट घनता यामुळे मुंबईपासून जवळच्या अंतरावर असलेल्या नाशिकमध्ये घरे घेण्याकडे कल वाढल्याने नाशिकमध्ये बांधकाम प्रकल्पांची संख्या वाढली आहे. असून राज्यात सहाव्या स्थानावर आहे. सध्या नशिक मध्ये नोंदणी झालेल्या प्रकल्पांची संख्या एक हजाराच्या वर पोहोचली आहे. नाशिक पासून रस्ते, हवाई, रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढल्याने मुंबई, ठाण्यात सहज ये-जा करता येणे शक्य झाल्याने देखील आल्हाददायक हवामानात राहण्यासाठी नाशिकला पसंती मिळत आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक पाठोपाठ नगर मध्ये १८० तर जळगाव मध्ये १०२ प्रकल्प नोंदविले गेले. विदर्भात नागपूर जिल्ह्यात ६९३, मराठवाड्यात औरंगाबाद मध्ये ५४४, कोकणात रत्नागिरी मध्ये ५२३, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२२, पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा ४७५, कोल्हापूर २९९, सांगली २५३, सोलापूर १९३ प्रकल्पांची नोंदणी झाली असली तरी मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक या भागात राज्यातील एकूण प्रकल्पांच्या ७० टक्के प्रकल्प या भागात सुरू असल्याने नागरीकरण देखील तेवढ्याच प्रमाणात वाढताना दिसते आहे.

नोंदणीकृत प्रकल्पांची सद्यःस्थिती

  1. - पुणे- ५५०८
  2. - मुंबई- ३४६३
  3. - ठाणे- २९१६
  4. - रायगड- २२१३
  5. - पालघर- १३५१
  6. - नाशिक- १०४२
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख