
March in Pune for Old Pension : सर्वच नवीन कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेली नवीन निवृत्ती वेतन योजना रद्द करून पूर्वलक्षी प्रभावाने सरसकट जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, त्याचबरोबर सर्व रिक्त पदे सरळ सेवा नियमाने तात्काळ भरावी, या मागण्यांसाठी पुण्यातील राज्य शासकीय, निमशासकीय तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मध्यवर्ती कार्यालय, पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन जिल्हा परिषद यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोर्चासाठी एकत्र आले होते. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसह सर्व रिक्त पदे सरळ सेवा नियमाने तत्काळ भरावी, कंत्राटीकरण रद्द करून चतुर्थश्रेणी तसेच वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी तातडीने हटवावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती तातडीने कराव्यात, समान काम समान वेतन या धोरणानुसार सर्वांनाच एकसारख्या वेतनश्रेणी द्यावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मुख्याध्यापकांचे काम सुरू पण...
जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केला आहे.
One Mission-Old Pension दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा टप्पा असतात, या परीक्षा सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य मंडळ, शिक्षण विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांनी केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या परीक्षेची तयारी, विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता याचा विचार करून केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल. पण, परीक्षा केंद्रावर काम करणारे कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाचे काम वगळता परीक्षाविषयक सर्व कामकाजावर बहिष्कार राहील, असे महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले "न्याय हक्काच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाला पाठिंबा आहे. परंतु सध्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची आणि पालकांची मानसिकता लक्षात घेऊन परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संपाला पाठिंबा असला तरीही, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.