बहुजन असल्याने राष्ट्रवादीचा मला संपवण्याचा डाव : पडळकर यांचा नवा आरोप

सांगली न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पडळकर (Gopichand Padalkar) यांची पहिली प्रतिक्रिया
बहुजन असल्याने राष्ट्रवादीचा मला संपवण्याचा डाव :  पडळकर यांचा नवा आरोप
Gopichand Padalkarsarkarnama

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी मुद्द्याची लढाई गुद्यावर आणत आहे. माझ्या गाडीवर सांगलीत हल्ला झाला. हल्ल्यासाठी ३ डंपर दगडे भरुन आणली होती, असा आरोप त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. मी बहुजन असल्याने मला संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.

आटपाडी राडा प्रकरणात पडळकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की माझा अर्ज न्यायालयाने फेटाळला असला तरी न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला तर स्वतः हजर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर गट अन् शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात जोरदार राडा

राज्यात सुरू असलेल्या एसटी आंदोलनाबद्दल ते म्हणाले की मी मानवतेच्या भावनेतून या आंदोलनात उतरलो. मात्र सरकार वेडेपिसे झाले आहे. त्यांना उपाय सुचायचे बंद झाले आहेत. या आंदोलनामुळे शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठी मान्यताप्राप्त संघटना पवारांची असल्याचे सांगण्यात येते. आजवर पवारांनी मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला, पण कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे. हा प्रश्न कायमचा मिटला तर या संघटनेचे दुकान बंद होईल. त्यामुळे निर्णय घ्यायला टाळाटाळ होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Gopichand Padalkar
आटपाडी राडा प्रकरण : गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

या प्रश्नावर सरकारशी चर्चा काय करायची, असा सवाल करत एसटीचे सरकारी सेवेत विलीनीकरण हीच आमची मागणी कायम आहे. दोन्ही बैठकांत कर्मचाऱ्यांनी हेच सांगितले आहे. सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. रोज नव्या पुड्या सोडत आहेत. कर्मचारी फुटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. एसटीतला भ्रष्टाचार थांबवला तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतका पगार मिळू शकेल, असा दावा त्यांनी केला.

Gopichand Padalkar
एसटी कर्मचाऱ्यांनो, मंत्रालयाच्या आवारातच संसार थाटा ; पडळकर आक्रमक

एसटी महामंडळ यांच्या बापाजाद्याची जहागिरी आहे का? एसटी कर्मचाऱ्यांच्या ३८ आत्महत्या झाल्या तरी दुःख संपत नाही, हे दुर्दैव आहेत. संपाचे नेतृत्व कर्मचारी करत आहेत. सरकारशी चर्चेची तयारी आहे. पण सरकारला मार्ग काढायचा नाही, असाही आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर लगेचच प्रतिक्रिया दिली. मात्र एसटीचे ३८ मराठी कर्मचारी आत्महत्या करतात, त्यांच्या बायकांची कपाळे पांढरी झाली. त्यावर सांत्वनाचे दोन शब्द ते बोलले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in