केंद्राच्या मोफत लसीकरणामुळे राज्याचे वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या

राज्य सरकारने केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे
bapat.jpg
bapat.jpg

पुणे : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी केली.(Give the state's remaining Rs 7,000 crore to the poor due to free vaccination by the Center)

देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतः उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे, असे स्पष्ट करून बापट यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेस आर्थिक संकटात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्राकरिता एकरकमी धनादेश देऊन १२ कोटी लस मात्रा विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. आता लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने या धनादेशाचा वाचलेला सुमारे सात हजार कोटींचा निधी राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावा व गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा, अशी भूमिका बापट यांनीमांडली आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची दमडीदेखील अजूनही कोणाच्याच खात्यात जमा झालेली नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली मोफत लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करून केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे व राजकारण न करता जनतेच्या जीवित रक्षणास प्राधान्य द्यावे, असे बापट यांनी स्पष्ट केले.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com