क्राईम ब्रॅंचचे दीड वर्षे डोके खाणारा खंडणीखोर बऱ्हाटे अखेर सापडला ! - Fugitive Ravindra Barhate was finally found | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

क्राईम ब्रॅंचचे दीड वर्षे डोके खाणारा खंडणीखोर बऱ्हाटे अखेर सापडला !

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

 बऱ्हाटे याची पत्नी संगीता आणि मुलगा मयुरेश याला गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे.

पुणे : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला अखेर गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी अटक केली. गेल्या वर्षभरापासून तो फरार होता. त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल असून त्यातील तीन गुन्ह्यांत मोक्का कायद्यानुसार कारवार्इ करण्यात आली आहे.(Fugitive Ravindra Barhate was finally found)

 बऱ्हाटे याची पत्नी संगीता आणि मुलगा मयुरेश याला गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. तर त्याच्या टोळीतील साथीदारांवर एकूण २२ गुन्हे दाखल असून त्यातील १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात सहभाग तसेच कटात सहभागी असल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. संबंधित गुन्ह्यात बऱ्हाटेसह १३ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानंतर बऱ्हाटेच्या मुलीची, जावयाची व इतर नातेवाइकांची देखील चौकशी सुरु करण्यात आली होती. याची माहिती मिळताच कुटुंबीयांना वाचवण्यासाठी धडपड करताना बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागला.

विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बऱ्हाटे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांनी २३ ऑक्‍टोंबर २०२० रोजी फरारी घोषित केले आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानेही फरार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई महसुल विभागाने केली. बऱ्हाटेच्या घरावर  छापा घातला असता त्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे दोन हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते. ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी केली.

रवींद्र बऱ्हाटेला अटक करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखा व पोलिस ठाण्याची पथके प्रयत्नशील होती. त्याच्याकडील चौकशीमध्ये तो आजवर कुठे-कुठे राहून गुंगारा देत होता हे उघड होईल, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख