माजी आमदार चाबूकस्वारही कृष्णप्रकाश यांच्याविरोधात उतरले..

पत्रात उल्लेख असलेले काही पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
माजी आमदार चाबूकस्वारही कृष्णप्रकाश यांच्याविरोधात उतरले..
Gautam Chabukswar Pimpri-Chinchwad Latest NewsSarkarnama

पिंपरी : तीन आठवड्यापूर्वी (२० एप्रिल) बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (IPS Krishna Prakash) तथा केपी यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची वसूली केल्याचे पत्र या महिन्यात (ता.६ मे ) व्हायरल झाल्यानंतर पोलिस दलातच (Pimpri Police) नव्हे, तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली. त्यावरून आता केपी यांच्यासह या पत्रात उल्लेख असलेले काही पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. कारण राज्य सरकारने (State Government) या पत्राची सचिवामार्फत चौकशी सुरु केल्याची माहिती शिवसेनेचे (Shivsena) शहरातील (पिंपरी) माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार (Gautam Chabukswar) यांनी आज (ता.१२ मे) दिली. (IPS Krishna Prakash Pimpri-Chinchwad Latest News)

Gautam Chabukswar Pimpri-Chinchwad Latest News
अखेर बदलीच्या ठिकाणी कृष्णप्रकाश हजर; म्हणाले, माझ्या बदलीचे कारण अद्यापही समजलं नाही..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचेच आमदार अण्णा बनसोडे यांनीही केपींची कारकिर्द संशयास्पद असल्याची तक्रार त्यांच्या बदलीनंतर नवीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर चाबूकस्वार यांनी, तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची काल (ता.११ मे) भेट घेऊन याप्रकरणी सीआयडी चौकशीची लेखी मागणी केली. यामुळे केपींच्या काळात नेमके काय घडलं, याचं गूढ कायमच राहिले नसून आता उलट ते आणखी वाढलं आहे.

Gautam Chabukswar Pimpri-Chinchwad Latest News
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा; आठवडाभरात मिळू शकतो डिस्चार्ज

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गृह विभागाकडे सोपवले. तर, गृहमंत्र्यांनी सचिव नियुक्त करून त्यांच्यामार्फत या पत्राची सत्यता व त्यातील आरोपांच्या चौकशीचा आदेश दिला असल्याचे चाबूकस्वारांनी सांगितले. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांना नक्की शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केपींनी कसा भ्रष्टाचार केला याच्या व्हायरल झालेल्या या पत्रामुळे शहात अस्वस्था पसरली असून पोलिस खात्याविषयी जनतेत संताप असल्याचा दावा त्यांनी केला. म्हणून हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्याकरिता आपण ही चौकशीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. हे पत्र असल्याचा संशयही त्यांनी वर्तवला. कारण जमिनींच्या व्यवहारात केपींनी मध्यस्थी केल्याच्या तक्रारी असल्याचे ते म्हणाले.

Gautam Chabukswar Pimpri-Chinchwad Latest News
कृष्णप्रकाश यांची बदली होताच आमदार अण्णा बनसोडे यांनाही कंठ फुटला!

केपींच नाही, तर या पत्रात उल्लेख असलेले पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांची त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्याची मागणी चाबूकस्वारांनी आपल्या पत्राव्दारे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या व केपींचे रिडर म्हणून काम केलेले एपीआय अशोक डोंगरे यांच्या नावे व्हायरल झालेले हे पत्र बनावट असल्याचा खुलासा ते व्हायरल झालेल्या दिवशी डोंगरे व केपी यांनीही लगेच केलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.