अजितदादांकडून शिवसेनेला दे धक्का; बारणेंच्या विश्वासू सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी हाच सर्वोत्तम पर्याय असल्याने पुन्हा घरवापसी केली.
अजितदादांकडून शिवसेनेला दे धक्का; बारणेंच्या विश्वासू सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
Ajit Pawarsarkarnama

पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचे (Shrirang Barne) उजवे हात शिवसेना जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी गेल्या महिन्यात २२ तारखेला शिवबंधन तोडून कमळ हाती घेतले. त्यानंतर तीन आठवड्यांतच शिवसेना आणि बारणे यांना पिंपरी चिंचवड शहरात दुसरा धक्का बसला आहे. बारणेंचे निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आज (ता.१४) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. पक्ष आपलाच आहे, असे सांगत मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे स्वागत केले.

Ajit Pawar
काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; कारण ठरले अमित शहा...

१५ वर्षे नगरसेवक म्हणून चांगली कामे करूनही २०१७ ला राष्ट्रवादीचा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पराभव झाला. तसाच तो बहिरवाडे यांचाही झाला. फक्त १२३ मतांनी ते पराभूत झाले. त्यानंतर राजकारणातून निवृत्तीच घ्यायचाच त्यांचा विचार होता. मात्र, २०१९ ला विधानसभा निवडणुकीनिमित्त बारणे यांच्याशी जवळीक असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण, गेली दोन वर्षे ते तिथेही सक्रिय नव्हते. पक्षाच्या कार्यक्रमात दिसत नव्हते. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी शेवटची निवडणूक लढवा म्हणून आग्रह धरला. त्यासाठी राष्ट्रवादी हाच सर्वोत्तम पर्याय असल्याने पुन्हा घरवापसी केली, असे बहिरवाडे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत ते स्वगृही परतले. पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यावेळी उपस्थित होते. बहिरवाडे हे १९९७ ला प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

Ajit Pawar
पुण्यात साकारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय

पिंपरी-चिंचवडचे भाजप कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील संतोष बारणे आणि राजू लोखंडे हे दोन माजी नगरसेवक याअगोदर राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्यानंतर शहराचे दुसरे कारभारी आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातील बहिरवाडे हे आज स्वगृही परतले. दरम्यान, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा हा प्रवेश सुरुच राहणार असल्याचे राष्ट्रवादीतील जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. फक्त पुन्हा घरवापसीच्या तयारीतील नगरसेवक हे, मात्र पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर परतणार आहेत, असे ते म्हणाले. अपात्र न ठरण्यासाठी तसेच टर्म सुद्धा पूर्ण होऊन कामे मार्गी लावण्यात अडथळा न येण्याकरिता हे वर्ष संपल्यानंतर निवडणूक जाहीर होताच भाजपचे अनेक नगरसेवक घड्याळ हातावर बांधणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.