
पिंपरी : देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी एकीकडे साजरी करीत असताना महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यातही अद्याप काही वाड्या, पाडे, वस्त्या या रस्ते, पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पुणे (PUNE) आणि मुंबई (Mumbai) दरम्यानच्या कर्जत तालुक्यातील तुंगी या आदिवासी पाड्यापर्यंत जाण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही साधा कच्चा रस्ताही झालेला नव्हता. तो स्थानिक मावळचे शिवसेनेचे (ShivSena) खासदार श्रीरंग बारणे ( Mp Shrirang Barne) यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या खासदार निधीतून आता होत आहे. रस्त्याच्या पाहणीसाठी प्रथमच या पाड्याच्या जवळपर्यंत मोटार स्वातंत्र्यानंतर प्रथमच रविवारी (ता.२४) गेली. चार वर्षापूर्वी २०१८ मध्ये बारणे यांच्यामुळेच या पाड्यावर प्रथमच वीज आल्याने तो उजळून निघाला होता.
सह्याद्रीच्या डोंगररांगात अतिशय दुर्गम भागातील तुंगी पाड्यावर मोठे मतदान नसल्याने तो अद्याप मुलभूत सुविधांपासून वंचित होता. मात्र, मतांचा नाही, पण माणसांचा विचार करून या पाड्यावरील आदिवासींचा प्रथम अंधार दूर केला. तेथे दीनदयाळ ग्रामज्योती योजनेतून वीज नेली. आता त्यांच्या दळणवळणासाठी रस्त्याचे काम सुरु केले आहे, असे बारणे यांनी सांगितले. ते बहूतांश पूर्ण होत आले आहे. त्याची रविवारी त्यांनी पाहणी केली. यानिमित्ताने प्रथमच या पाड्याच्या जवळपर्यंत मोटार गेली.
आता सर्व प्रकारची वाहने तुंगीला सहज जाऊ शकणार आहेत. आजवर कोणत्याही नेत्यांनी न केलेली कामे बारणे यांनी केल्याने 'आप्पा प्रत्येक वेळी तुम्हीच निवडून या' अशी भावनिक साद यावेळी पाड्यावरील रहिवाशांनी घातली. तत्पूर्वी त्यांनी बारणेंचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने तुंगी पाड्यावर रस्ता तयार करण्यासाठी विविध विभागांकडे त्यांना पाठपुरावा करावा लागला. आतापर्यंत 68 लाख रुपये त्यावर खर्च झाला आहे. मतांच्या बेरजेसाठी नाही, तर लोकांच्या गरजेसाठी शंभर-दीडशे लोकवस्तीचे दुर्गम पाडे, वाड्या, वस्त्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यााचा अट्टाहास असल्याचे बारणे यांनी सरकारनामाला सांगितले. शहरी भागात सर्व सुखसुविधा असतात. त्यावर कोट्यावधी रुपये खर्चही केला जातो.
रस्त्यावर एखादा खड्डा पडला तरी लगेच चर्चा होते. वीजपुरवठा खंडित झाला तर लगेच संबंधित यंत्रणांना फोन केला जातो. परंतु ज्या ठिकाणी व्यवस्थाच नाही, रस्त्यावरील खड्ड्याची तक्रार करण्यासाठी रस्ताच नाही, अशा दुर्गम भागात तो केल्याचा मला अभिमान आहे. त्यातून आदिवासींच्या चेह-यावर आनंद बघायला मिळाला. त्यांचे ते समाधान हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे संचित आहे. असे ते म्हणाले, या रस्त्याचे भविष्यात डांबरीकरण करून तो अधिक चांगला केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, रस्ताच नसल्याने तुंगी येथील रहिवाशांना आजारपणात, पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत होती. वाहन पोहोचू शकत नसल्याने तेथील रुग्णांना झोळीतून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे लागत होते. आता ही कसरत थांबणार आहे. तसेच तेथील नागरिकांचे जीवनमानही उंचावण्यास वीज व आता रस्त्यामुळे मदत होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.