भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून राष्ट्रवादीतच जुंपली!

बहुतांश सर्व पदाधिकारी विरोधात असल्याने राष्ट्रवादीने प्रस्तावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला. पदाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायची मुभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र त्यावर बऱ्याच घडामोडी झाल्या.
Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे : पुणे महापालिकेच्या ‘अ‍ॅमेनिटी स्पेस’च्या (PMC`s proposal on amenity spece)  जागा दीर्घमुदतीने देण्याच्या प्रस्तावास पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) घेतला होता, पण त्यावरून पक्षातील मतभेद उघड झाले. भाजपच्या प्रस्तावास सशर्त पाठिंबा दिल्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.

भाजपचा हा प्रस्ताव फसवा आहे, त्यातून अर्बन फॉरेस्ट होणारच नाही, त्यांनी आश्‍वासन पाळले नाही तर आपण पुणेकरांना काय तोंड दाखवावे असे प्रश्‍न उपस्थित झाले. बैठकीतील बहुतांश सर्व पदाधिकारी विरोधात असल्याने राष्ट्रवादीने प्रस्तावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला.


पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत २७० ‘अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय आज(गुरुवारी) मुख्यसभेत घेतला जाणार होता. राष्ट्रवादीच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अ‍ॅमेनिटी स्पेसचा मास्टर प्लॅन तयार करणे व ३३ टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी राखीव ठेवणे या दोन अटी भाजपने मान्य केल्या आहेत, त्यामुळे या प्रस्तावास पाठिंबा देणार असल्याचे स्‍पष्ट केले. पण त्याचवेळी प्रशांत जगताप यांनी नगरविकास खात्याला पत्र देऊन अ‍ॅमेनिटी स्पेसचा विषय विखंडीत करा असे विरोध करणारे पत्र दिले. एकाच दिवशी दोन भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद निर्माण झाली.

भाजपतर्फे बुधवारी रात्री उशिरा सुधारित प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला, पण त्यात सुधारणा झालेली दिसली नाही. त्यावरून पुन्हा एकदा आज सकाळी खासदार वंदन चव्हाण व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात अटी मान्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे वंदना चव्हाण या भूमिका कायम ठेऊन राष्ट्रवादीच्या बैठकीला गेल्या. यावेळी आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दीपक मानकर,  सुभाष जगताप, दत्तात्रेय धनकवडे ,बाबूराव चांदेरे, विशाल तांबे, दिलीप बराटे, सचिन दोडके, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यावेळी उपस्थित होत्या.

या प्रस्तावाची चर्चा करताना प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी उपायुक्त राजेंद्र मुठे यांनाही बोलविण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले, पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावर बहुतांश सर्वच नगरसेवकांनी हा प्रस्ताव चुकीचा आहे, पुणेकरांना काय उत्तर देणार?, या प्रस्तावात भाजपचा फायदा आहे, ज्यांना जागा द्यायच्या आहेत, त्यांची नावे देखील निश्‍चीत झाले आहेत. अशी चर्चा झाल्याने या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय झाला.


भाडेकरूच ठरविणार जागेचा वापर
अ‍ॅमिनेटी स्पेसच्या जागा १९ कारणांसाठी वापरता येणार आहेत, पण नेमका कोणता वापर करायचा हे जो संबंधित भाडेकरूच ठरविणार आहे अशी अट टाकली हे. त्यामुळे त्यात त्याचाच फायदा आहे, असे असेल तर अर्बन फॉरेस्टची अंमलबजावणी कशी होणार? असा प्रश्‍न सुभाष जगताप यांनी उपस्थित केला. त्यावर वंदना चव्हाण यांनी ७४ व्या घटना दुरुस्तीचा दाखला देऊन हे कसे कायदेशीर आहे हे सांगितले. पण ती भूमिका इतरांना मान्य न झाल्याने बैठकीत वाद झाला. पुणेकरांनी आपल्याला जागा भाड्याने देण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी पाठविले आहे. राज्यभरात आपण भाजप विरोधात लढत असताना पुण्यात मदत करत असल्याने चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका मानकर यांनी मांडली.


‘‘भाजपने आमच्या अटी मान्य केलेल्या नाहीत, त्यावर आज सकाळी बैठक झाली, प्रस्तावास विरोध करायचा हेच ठरले आहे. पक्षात लोकशाही असल्याने इतरांच्या ही मताचा विचार केला जातो, त्यामध्ये मतभेद नाहीत. भविष्यात अ‍ॅमेनिटी स्पेससह ई बाईक, फ्लॅट विक्री या विषयालाही विरोध करू फक्त मेट्रोच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला जाईल.’’
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com