फडणवीस म्हणाले;पंकजा यांनी मांडलेली भूमिका पक्षाचीच  - Fadnavis said; the role played by Pankaja belongs to the party | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस म्हणाले;पंकजा यांनी मांडलेली भूमिका पक्षाचीच 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

बातम्यांमधून गैरसमज पसरवू नका,असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केले.

पुणे : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी मांडलेली भूमिका पक्षाचीच आहे. कुणीही नाराज नाही. माध्यमातूनच चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आधी राष्ट्र. नंतर पक्ष व शेवटी व्यक्ती ही पक्षाचीच भूमिका मुंडे यांनी मांडली असल्याचे सांगत बातम्यांमधून गैरसमज पसरवू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 9devendra fadanvis) यांनी आज पुण्यात केले.(Fadnavis said; the role played by Pankaja belongs to the party)

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रितम मुंडे यांना सामील करून घेण्यात येणार अशा बातम्या गेला आठवडाभर माध्यमांत येत होत्या. सोशल मिडीयात तर या विषयाची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्ष विस्तारात प्रितम यांचा समावेश झाला नाही. त्यासंदर्भाने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा सोशल मिडीयात सुरू झाल्या. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या प्रयत्नात जुन्यांना संधी मिळत नसल्याची भावना पंकजा यांनी व्यक्त केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. प्रत्यक्षात या प्रकारचे वक्तव्य पंकजा यांनी केले नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. या विषयी विचारले असता फडणवीस  म्हणाले, ‘‘ हा प्रश्‍न विचारण्यात येईल म्हणून मी माहिती घेऊन आलो आहे. मुंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला जातोय त्या वक्तव्यात त्यांनी तसे म्हटलेले नाही. आधी राष्ट्र. त्यानंतर पक्ष व सर्वात शेवटी व्यक्ती ही भाजपाची विचारसरणी असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, माध्यमातून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे.’’ 

राज्य सरकारवर टीका करताना फडवीस म्हणाले, ‘‘ प्रत्येक प्रश्‍नांपासून सरकार पळ काढत आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हादेखील इंधनाचे दर वाढत होते. मात्र. त्यावेळी केंद्राकडे बोट न दाखवता आम्ही राज्याच्या कराचा भाग कमी करून डिझल व पेट्रोलचा भाव पाच रूपयांनी कमी होता. आताही राज्य सरकारने राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. धनगर, मराठा व ओबीसी आरक्षणाच्या विषयातही राज्य सरकार स्वत: ज्या गोष्टी करायच्या आहेत. त्याला बगल देत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आह.’’

दोन दिवसांच्या विधी मंडळ अधिवेशनातही सरकारने कट रचून भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना निलंबित केले. माझ्या पक्षाच्या आमदारांसोबत मी होतो. माझ्या पक्षाच्या एकाही आमदारांने शिवीगाळ सोडाच चुकीचे शब्द वापरले नाही. पुढची पंचवीस वर्षे मला राजकारण करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द मी जबाबदारीने वापरत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख