पुणे-पिंपरीसह जिल्ह्यात सध्याचेच निर्बंध लागू राहणार - The existing restrictions will remain in force in the district including Pune-Pimpri | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पुणे-पिंपरीसह जिल्ह्यात सध्याचेच निर्बंध लागू राहणार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

 पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर 4.6 टक्क्यांवरून 5.3 टक्के झाला आहे.

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनासंदर्भात जे निर्बंध लागू आहेत, तेच पुढील आठवड्यातही लागू राहतील. मॉल पूर्णपणे बंदच राहणार असून, एमपीएससी आणि यूपीएससीचे प्रशिक्षण वर्ग सकाळी सात ते चार या कालावधीत सुरू करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.(The existing restrictions will remain in force in the district including Pune-Pimpri)

कोरोना उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आज बैठक झाली. या आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘ गेल्या आठवड्यात पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर 4.6 टक्क्यांवरून 5.3 टक्के झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील रुग्ण दर 5.1 टक्क्यांवरून 5.4 टक्के झाला आहे. तर, ग्रामीणमधील रुग्ण दर 7.6 टक्क्यांवरून 7.3 टक्के झाला आहे. रुग्ण दरात काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यात लेव्हल तीन नुसार सध्याची नियमावली पुढील आठवड्यातही लागू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.मॉल बंद राहतील. यूपीएससी आणि एमपीएससीचे प्रशिक्षण वर्ग सकाळी सात ते दुपारी चार या कालावधीत नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, 18 वर्षांवरील खेळाडूंना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्यास क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयांमधील वर्ग सुरू करण्यात येणार असून, लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

राज्य सरकार नवीन 500 रुग्णवाहिका खरेदी करणार आहे. त्यातून पुणे जिल्ह्याला काही रुग्णवाहिका उपलब्ध होतील. जिल्ह्यातील रुग्णालयांनी कोरोना बाधित रुग्णांकडून जादा आकारणी करण्यात आलेल्या 483 वैद्यकीय बिलांचे प्रशासनाकडून लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा वसूल करण्यात आलेली 32 लाख 65 हजारांची रक्कम कमी झाली. गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. तसेच, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख