ओमिक्रॅानचा पुणे, पिंपरीत शिरकाव; सात जण आढळले पॅाझिटिव्ह

कोरोना विषाणुच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमिक्रॉन विषाणुचा संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
Omicron
OmicronSarkarnama

cfपिंपरी : ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) नव्या विषाणुने राज्याची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचे राज्यात आता ९ रुग्ण झाले आहेत. आज (ता. ५) पिंपरी-चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) ६ रुग्ण आढळले आहेत. पुण्यामध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. कल्याण डोंबिवलीमध्येही २ रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडे टेन्शन वाढले आहे. लॅकाडाऊनमधून आताच कुठे राज्याने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

ओमिक्रानचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सापडला होता. त्यानंतर जगभरातील 29 देशांमध्ये या विषाणुने शिरकाव केला आहे. कोरोना विषाणुच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमिक्रॉन विषाणुचा संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे जगभराची चिंता वाढली. आता राज्यातही ९ रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. लागण झालेले रुग्ण दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियाहून आलेले आहेत.

Omicron
ओमिक्रॉननं गाठली राजधानी; टांझानियाहून आलेल्या प्रवाशाला लागण

प्रथम कर्नाटकात या नव्या कोरोनाचे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर त्याची एंट्री महाराष्ट्रात पहिल्यांदा डोंबीवलीत झाली. तर, रविवारी (ता.५) तब्बल सहा ओमिक्रॉन रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्याने महापालिका प्रशासन हादरून गेले आहे. त्यात एक दीडवर्षीय चिमुकली आहे.

उद्योगनगरीतील सहा ओमिक्रॉन रुग्णांत चार मुली, एक महिला आणि या महिलेचा भाऊ आहे. या भावाला भेटण्यासाठी ही ४४ वर्षीय बहिण २४ नोव्हेंबरला टांझानियाहून आपल्या १८ आणि १२ वर्षाच्या दोन मुलींसह भारतात उद्योगनगरीत आली होती. त्या वेळी या मायलेकींना कोरोना झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तो ओमिक्रॉनचा नवा प्रकार आहे का हे निश्चीत करण्यासाठी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमूने पुण्यातील `एनआयए`त `जिनोम सिकव्हेंसिग`या चाचणीकरिता पाठवण्यात आले.

Omicron
`तो` दक्षिण अफ्रिका, दुबई, दिल्लीहून आला अन् `ओमायक्रॉन` घेऊन आला!

दरम्यान, संपर्कात आल्याने या महिलेचा भाऊ व त्याच्या सात व दीड वर्षीय अशा दोन मुलीही कोरोना पॉझीटीव्ह आढळल्या. त्यांचेही असे नमूने `एनआयए`पाठविले गेले. त्याचा अहवाल आज मिळाला. या सर्वांना ओमिक्रॉन झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले. ते सर्व पिंपरी महापालिकेच्या पिंपरी येथील नव्या जिजामाता रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे गृह विलगीकरण करण्याची दक्षता पालिकेने घेतली आहे.

ओमिक्रॉनचा मोठा प्रवेश झाल्याने पिंपरी पालिका प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. त्यांची चिंता वाढली आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना नियंत्रणात आल्याने नुकताच त्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा नव्याने त्यांना उपाययोजना व त्यातही लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे. फिनलंडला गेल्या महिन्यात गेलेला एक ४७ वर्षीय तरुण २९ नोव्हेंबरला कोरोना संक्रमित आढळला. त्यालाही ओमिक्रॉन झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे महापालिकेचीही काळजी वाढली आहे. गेल्या २४ तासात आणखी ३७ जणांना कोरोनाचा प्रार्दूभाव झाल्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com