
पिंपरी : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य वीज कर्मचाऱ्यांनी आज (ता.३) मध्यरात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यावर अंधाराचे सावट राहणार आहे. तर वीज अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचे `महावितरण`ने स्पष्ट केले आहे. (Electricity Workers Strike)
राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीमधील २९ विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. तो झाला, तर पुणे परिमंडळांतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली असून पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांसह आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यांमध्ये सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे, असे `महावितरण`च्या पुणे परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नितीन राऊत यांनी आज सांगितले.
वीजपुरवठ्याबाबत चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर २४ तास सज्ज असून तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन `महावितरण`ने केले आहे.
संपकाळात वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण व राज्य शासनाचे विविध विभागांमध्ये समन्वय सुरु झाला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (पुणे), शेखर सिंह (पिंपरी), पोलीस आयुक्त रितेश कुमार (पुणे), विनय कुमार चौबे (पिंपरी) यांना लेखी निवेदन देऊन संपाबाबत माहिती दिली आहे.
त्यानुसार संपाच्या आपत्कालीन परिस्थितीत महावितरण व शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीस विभागाला महावितरणचे कार्यालय व उपकेंद्रांची यादी देण्यात आली आहे.
त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण दिले जात आहे. महावितरणचे सुरक्षा अधिकारी तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
या संपाची व्याप्ती मोठी असल्याने पर्यायी सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.