पुण्यात आमचा नादच करू नका

राज्यात सत्ताबदल झाला म्हणून पुणेही पुन्हा हिसकावून घेता येईल या भ्रमात राहू नका !
fadanvis.jpg
fadanvis.jpg

पुणे : राज्यात सत्ताबदल झाला म्हणून पुणेही पुन्हा हिसकावून घेता येईल या भ्रमात राहू नका, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने दिला आहे. पुण्याच्या रखडलेल्या विकासाला गती देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतच मिळाली, याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीने होर्डिंग्जद्वारे शहर व्यापून टाकले आणि वृत्तपत्रांतील पुरवण्यांनी आपल्या प्रचारमोहिमेचे रणशिंग फुंकले.(Don't make a chalange in Pune)

 पुण्याचे कारभारी असे मानले जाणारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी कंबर कसली होती, पण हा पहिला राऊंड निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस च्या पारड्यात जाईल, याची खबरदारी भाजपाने घेतली. एकजुटीने निवडणुका लढण्याचा भाजपाचा निर्धारही या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त झाला.

पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने गेल्या तीस वर्षांत चारदा खासदार निवडून आणले असले, तरी महापालिकेचा गड कधीच सर करता आला नव्हता. २०१७ च्या निवडणुकीत आक्रमक प्रचार, महानगरांच्या समस्या जाणणारा आणि सोडविण्याची  क्षमता असलेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री, या बळावर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना भाजपाने चारीमुंड्या चीत केले होते. त्याचे खरे शल्य या शहरावर ज्यांचा ताबा आहे असे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनात आहे.

 राज्यात २०१९ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर आपण पुण्यावर पुन्हा पकड मिळवू शकू, अशा विश्वासात वावरणाऱ्या  राष्ट्रवादीला डोके वर काढायची संधीच द्यायची नाही आणि बचावात्मक पवित्र्यात यायचेच नाही, अशा जबर आत्मविश्वासाच्या भावनेने भाजपाने फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले. एकही अनधिकृत होर्डिंग लागणार नाही, याची दक्षता घेतली गेली. पुण्याच्या गेल्या पाच वर्षांतील विकासाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, हे ठसविणारी वाक्यरचना आणि पुण्याच्या संस्कृतीला शोभेल अशा पद्धतीने होर्डिंग्जवरचे डिझाईन, संपूर्ण शहरभर एकाच पद्धतीचे डिझाईन, याच्यातून भाजपाने परिणाम साधण्याचा प्रयत्न केला. 

‘सकाळ’ या दैनिकात तर तब्बल ५६ पानांची पुरवणी प्रकाशित करण्यात आली. ही पुरवणीही विशिष्ट रचना निश्चित करून त्यानुसारच होती. फडणवीस यांच्यासाठी कोणती विशेषणे वापरायची, त्यांची कोणती छायाचित्रे असली पाहिजेत, कोणते प्रकल्प दिसले पाहिजेत, हे निश्चित करून केलेल्या पुरवणीमुळे पुण्यातील भाजपाचा दबदबा कायम असल्याचा संदेश देण्यात पक्ष य़शस्वी ठरला. एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवणी निघण्याची पुण्याच्या, किंबहुना राज्यातील वृत्तपत्रांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल. भारतीय जनता पार्टी हाच पुण्यातील सर्वात मोठा पक्ष आहे, त्याचा विस्तार पुण्यातील कानाकोपऱ्यांत  आहे आणि त्याच्या ताकदीसमोर अन्य पक्ष आसपासही नाहीत, हा संदेश पोहोचविण्यात भाजपा यशस्वी ठरला. पुण्याच्या भाजपाचे नेतृत्व करणारी नवी पिढी स्थिरावते आहे, हेही या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पष्ट झाले.

कार्यकर्ता राजकीयदृष्ट्या सज्ज
गेले १६ महिने पक्ष कार्यकर्ता कोरोनातून पुण्याला बाहेर काढण्यासाठी मेहनत करीत होता, सेवाकार्यात जोमाने उतरलेला होता, महापालिका निवडणुकीला काही महिने उरलेले असताना हा कार्यकर्ता राजकीयदृष्ट्याही सज्ज झालेला आहे. पुण्याचा गोठलेला विकास देवेंद्रजींच्या काळात मार्गी लागल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पक्षाने आपल्या निवडणूक तयारीची चुणूक दाखविलेली आहे, असे पक्षाचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com