तुम्हाला विसर्जनाची पद्धत आणि संस्कार माहीत नाही? अंधारेंनी राणांना आरसा दाखवला

Navneet Rana| Sushma Andhare| मुर्ती विसर्जन पद्धतीवरुन खासदार राणा विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
Navneet Rana| Sushma Andhare|
Navneet Rana| Sushma Andhare|

पुणे : दोन वर्षांनंतर राज्यभरात गणपती उत्सव आणि विसर्जन थाटामाटात पार पडला. खासदार नवनीत राणा यांच्या घरच्या बाप्पाचंही विसर्जन करण्यात आलं. पण त्यांच्या याच विसर्जनाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यांच्या मुर्ती विसर्जन पद्धतीवरुन खासदार राणा विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जनासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाची मुर्ती डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या. पण नंतर त्यांनी बाप्पाची मुर्ती तलावात अक्षरश: फेकून दिली. इतकेच नव्हे तर ज्या पाण्यात त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं, ते पाणी अस्वच्छ होतं आणि गढूळ होतं. नवनीत राणांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राणांवर सडकून टीका केली आहे.

Navneet Rana| Sushma Andhare|
खासदार श्रीकांत शिंदेंचे भाजपला उत्तर; ‘माझे जे काही होईल, ते कल्याणमधूनच...’

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

''नवनीत राणाजी आपण वारंवार धर्माच्या नावावर जे अवडंबर माजवत आहात. पण तुम्हाला जरा आरसा दाखवण्याची गरज आहे. आम्ही अत्यंत सयंत आणि संयमी भाषेत पद्धतीने तुम्हाल वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की, आम्ही आपल्यासारखे उर बडवून आक्रस्ताळेपणाने बोलत नाहीत याचा अर्थ आम्हाला धर्म कळत नाही, असं अजिबात नाही. अशा शब्दांत सुषमा अंधांरे यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे.

फक्त फरक एवढा आहे की, आम्हाला वाटतं की, धर्म हा माणसाच्या सौख्यासाठी समृद्धीसाठी आणि त्याची मानसिक उमेद कायम करण्यासाठी असतो. ना की धर्माच्या नावावर माणसाची कोंडी करून त्याचं जगणं मुश्किल करण्यासाठी असतो. नवनीत जी तुम्ही हनुमान चालीसासाठी थयथयाट केला, परंतु तुम्हाला साधी हनुमान चालीसाही म्हणता येत नाही ? हनुमानाला हनुमान का म्हणतात याचंही नेमकं कारण तुम्हाला सांगता येत नाही. काल आपण कहरच केला ज्या पद्धतीने आपण श्रींचे विसर्जन केले. आपल्याला विसर्जनाची साधी पद्धत आणि संस्कार माहीत असू नयेत आणि आपण स्वतःला हिंदूत्ववादी म्हणवून घेता? असा सवाल करत सुषमा अंधारेंनी राणावर आसूड ओढला आहे.

दरम्यान एखाद्या धर्माचे काय पद्धतीने पूजाअर्चा केली जाते? त्याला कुठल्या अधिष्ठानमध्ये बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, एवढी गोष्ट जर आपल्याला कळत नसेल तर आपला हा उरबडवेपणा काय कामाचा नवनीत जी ? बर कालची तुमची विसर्जनाची पद्धत चुकली, पण तुमच्या ऐवजी काल जर विसर्जनाच्या जागी कोणी शेख, पठाण कादर, हैदर, अली, बेग, अशा आडनावाचा कोणी असता तर कल्पना करा आपण काय गहजब केला असता ? त्यामुळे हा बेगडीपणा, तकलादूपणा आता बंद करा, असा सणसणीत टोला अंधारे यांनी लगावला.

तुम्ही वारंवार वारंवार तोंडघशी पडताय हे मी समजू शकते, कारण तुम्हाला लाईट,कॅमेरा, अॅक्शन अशा फोकसमध्ये राहायची सवय लागली आहे. पण हे आयुष्य आहे, इथे प्रत्येक वेळेला रिटेक करता येत नाही, इथे फर्स्ट स्टेजलाच शॉट ओके द्यावा लागतो आणि फर्स्ट स्टेजलाच शॉट ओके दिला नाही तरी आयुष्यातून शॉट होण्याची वेळ येते. अजुनही वेळ आहे, सावरा स्वत: ला. असा सणसणीत टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in