मंत्रालयात काय तुमचा काका काम करतो का : अजितदादांनी मंत्र्याला विचारलेल्या सवालाने हास्यकल्लोळ

उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले की अधिक खुलून भाषण करतात. या वेळीही तसेच झाले.
ajit pawar indapur
ajit pawar indapur

पुणे : इंदापूर येथील एका शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे भाषण खूपच गाजले. चाैफेर टोलेबाजी करीत त्यांनी शेतकऱ्यांनाही बोलते केले. केंद्र राज्य यांच्या प्रश्नापासून ते इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतीपर्यंतचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. स्थानिक नेत्यांची फिरकी घेत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करत, कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत त्यांनी भाषणात रंगत आणली.

इंदापूरचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रेय भरणे यांचे कौतुक करत यांच्याकडे इतकी खाती आहेत की ते राज्यातील मोठे मंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे असलेले सामान्य प्रशासन हा विभाग सुद्धा त्यांच्याकडे आहे, म्हणजे बघा, असे म्हणत त्यांचे कौतुक केले. मी जसा बारामतीला रविवारी वेळ देतो, तसा तु्म्ही इंदापूरला कधी वेळ देता, असा प्रश्न त्यांनी व्यासपीठावरील भरणे यांना केला.  त्यावर भरणे यांनी मी चोवीस तास इंदापूरसाठी वेळ देतो, असे उत्तर दिले.  त्यावर उत्स्फूर्तपणे मग मंत्रालयात काय तुझा काका काम करतो काय, असा थेट सवाल विचारला आणि त्यामुळे एकच हशा उसळला. गमतीचा भाग जाऊ द्या, असे म्हणत पुन्हा दाद सावरले. अजित पवार आणि भरणे यांचे संबंध 3--35 वर्षे जुने आहेत. त्यामुळे अजित पवार हे भरणेंचा उल्लेख दत्ता, असा एकेरीच अनेकदा करतात. 

``यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रीपद आहे. त्यांच्यापुढे बबनदादा, यशवंत माने असे आमदार पुढेपुढे करतात. मग हे पालकमंत्री बघतो, पाहतो, असे सांगतात. पुण्याचा पालकमंत्री जसे करतो तसेच हे सोलापूरात करतात, असे म्हणत स्वतःवर देखील कोटी केली.

आम्ही मंत्री झालो. पण कधी जाकिट नाही घातलं, असा टोला त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लगावला. ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत पवार साहेबांच्या डाव्या आणि उजव्या हाताला बसणाऱ्यांनीच ग्रामपंचायत निवडणुकीत कसा धोका दिला, याचाही उल्लेख त्यांनी केला. धोका या शब्दाच्या ठिकाणी त्यांना खरे तर वेगळा शब्द वापरायचा होता. पण तो शब्द वापरला तर ब्रेकिंग न्यूज ठरेल, असे म्हणत तो शब्द त्यांनी टाळला. त्यानंतरच्या पुढच्या वाक्यात त्यांनी काही लोकांकडे घोडे आहेत, असे म्हणत आपल्याला काय म्हणायचे होते, ते अप्रत्यक्षरित्या सांगून टाकले.   

 अधिकारी अन ठेकेदारांना सोडणार नाही

रस्त्याचे काम असेल, शाळेचे काम असेल किंवा कोणत्याही योजनेतील कामे असेल, त्याचे काम दर्जेदारच झाले पाहिजे. कामाच्या दर्जा चांगला ठेवा. पैशाची चणचण असताना आपण ही कामे करीत आहोत. ठेकेदारांनाही परवडले पाहिजे. कामांत कुचराई आढळल्या मी त्या अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, आणि त्या ठेकेदारालाही सोडणार नाही. ते खपवून घेणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

राज्यात विकासाची गाडी रुळावर येतेय !

कोरोनाच्या काळात अनेक अडचणी आल्या. आता राज्याच्या विकासाची गाडी रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. सर्व ठिकाणी चांगले कामे होतील. आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. निर्व्यसनी राहा. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा. शब्दाचे पक्के रहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठेने रहा. आपण चांगला विकास करू, असे पवार यांनी सांगितले. 

कर्जत तालुक्यात रोहितला निवडून दिले. काय कामे चालली पहा. राष्ट्रवादीला निवडून दिल्यानंतर काय होते, ते बारामती, इंदापूर येथे पाहा.  राष्ट्रवादीला निवडून दिले नाही तर  काय होत नाही ते दाैंडमध्ये पाहावे, याचाही उल्लेख त्यांनी केला. मी जे बोलतो ते करतो, ही महाराष्ट्राला माझी ओळख आहे. आपण एवढे चांगले कामे करू की लोकं इतरांना विसरून जातील. काम करावे तर ते राष्ट्रवादीनेच करावे, अशी कृती करून दाखवू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com