`आमदार व्हायचे स्वप्न बघू नका.. नाहीतर संपवून टाकू` - do not dream of becoming MLA otherwise will finish you | Politics Marathi News - Sarkarnama

`आमदार व्हायचे स्वप्न बघू नका.. नाहीतर संपवून टाकू`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी

पुणे : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना शनिवारी दुपारी जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आल्याने खळबळ उडाली आहे. पदवीधरांच्या मतदारसंघात असा प्रकार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित व्यक्तिविरुद्ध पोलिस कारवाईस प्रारंभ झाला आहे. तसेच पाटील यांनी पोलिस संरक्षण मिळावे, म्हणूनही पोलिसांना कळविले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत असताना रुपाली पाटील यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तिने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेल, अशा आशयाची धमकी दिली. तसेच साताऱ्यातून दाभाडे बोलत आहे, असे सांगत आक्षेपार्ह वक्‍तव्येही केली. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी घडली. धमकीचा फोन येताच पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांच्या दूरध्वनीमध्ये हा कॉल रेकॉर्ड झाला असून त्याची कॉपी, संबंधित मोबाईल क्रमांक त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्यामुळे पोलिस संरक्षणही मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनीही या बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पाटील यांचे पती ऍड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले, ""पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रुपाली पाटील यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचही जिल्ह्यांत प्रचाराच्या दोन फेऱ्या झाल्या असून अनेक ठिकाणी मतदारांनी पक्ष बाजूला ठेवून युवा उमेदवार म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही समाजविघटक घटकांना हा प्रतिसाद सहन झालेला नाही. त्यामुळेच त्यांनी रुपाली पाटील यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या घटनेमुळे आमच्या मनोधैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही अधिक जोमाने प्रचार करू.'' धमकी मिळाल्यावरही विचलीत न होता पाटील यांनी प्रचार सुरू ठेवला आहे.

दरम्यान या बाबत खडक पोलिस ठाण्यात विचारणा केली असता, कॉलच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण लाड, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे, अपक्ष श्रीमंत कोकाटे आदी निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सुमारे 4 लाख 26 हजार मतदार असून त्यातील 1 लाख 36 हजार मतदार पुण्यातील आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख