अण्णा हजारे यांनी अमित शहांना पत्र काय लिहिले आणि दोन मित्रांतच वाद पेटला...

अण्णा हजारे (Anna Hazare) हे संघाशी संबंधित की खरोखरीच भ्रष्टाचाराच्या विरोधी मोहिमेचे नायक, हा ठरला वादाचा मुद्दा
Hari Narke-Vishwambhar Choudhri
Hari Narke-Vishwambhar ChoudhriSarkarnama

पुणे : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीक सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आणि त्याच्या चौकशीचे मागणी करणारे पत्र पाठविले. या पत्रामुळे खरेतर राजकीय वाद सुरू व्हायला हवा. यातील बरेच कारखाने काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांशी संबंधित असताना त्यांनी या पत्राबद्दल आक्षेप घ्यायला हवा होती. त्यांनी भाजपवर टीका करायला हवी आणि भाजपने त्यांना उत्तर द्यायला हवे होते. मात्र अण्णांच्या या पत्राच्या निमित्ताने पुरोगामी वर्तुळातील दोन मित्रांतच सोशल मिडियात वाद पेटला आहे. एकमेकांना अनफाॅलो करण्याबद्दल ही कटुता वाढली.

विचारवंत हरी नरके (Hari Narke) आणि सामाजिक कार्य़कर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhri) यांच्यातील हे भांडण अण्णा हजारेंच्या पत्रामुळे लागले आहे. दोघांनीही आपापल्या स्वभावानुसार एकमेकांना उत्तर दिले आहे. नरके यांनी चौधरी यांचे `वैचारीक स्कूल` काढत ते भाजपच्या वळचणीला असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवले आहे. तसेच `आमच्या वस्तीची बेअब्रू करता` असा उल्लेख करत त्यांची जात दाखवून देण्यासही नरके यांनी मागेपुढे पाहिलेले नाही.

नरके यांची ही भाषा चौधरी यांना पसंत पडली नाही. पुरोगामी म्हणून घेऊन सतत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जातीत ढकलत राहतात, अशा मित्रांपासून सुटका करून घेण्याची वेळ आळी आहे, असे निरोपाचे मत व्यक्त केले आहे.

या वादात आणखी एक उपवाद होता. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथूरामाची भूमिका केल्याने चौधरी यांनी त्यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली होती. नरके यांनी कोल्हे यांनी माफी मागावी, असा सूर लावला होता. तसेच कोल्हेंच्या निमित्ताने काही काही सच्चे गांधीवादीसुद्धा इतके संतापले की त्यांचा तोल गेला. नथुरामपेक्षा त्यांचा अमोल कोल्हे, शरद पवार यांच्याबद्दलचा विखार बाहेर पडला. नथुरामची भूमिका हे त्यांना फक्त निमित्त हवे होते. जुने रागलोभ सेटल करायचे होते. बहुसंख्य लोक संधीची वाटच बघत असतात. कसलेही किरकोळ निमित्त त्यांना पुरते, असे मत कोल्हेप्रकरणी नरके यांनी व्यक्त केले.

Hari Narke-Vishwambhar Choudhri
अण्णांचे अमित शहांना पत्र: वैयक्तिक स्वार्थासाठी सहकारी कारखाने विकलेत, तातडीने चौकशी करा

या दोघांमधील वाद कोणत्या पोस्टने सुरू झाला आणि नक्की काय घडले, हे क्रमाने पाहू. अण्णा हजारे यांनी पाठविलेल्या पत्राच्या बातम्या आल्यानंतर आधी नरके यांनी आपली पोस्ट लिहिली. ही पोस्ट पुढीलप्रमाणे. यात त्यांनी हजारे यांचा गन्ना पगारे असा अवमानकारक उल्लेख केला. तसेच किरीट सोमय्या यांना टिलित तोमय्या असे यात म्हटले.

नरके यांची मूळची पोस्ट पुढीलप्रमाणे

गन्ना पगारे यांचा लॉग इन आयडी भ्रष्टाचार निर्मूलन असला तरी त्यांचा पासवर्ड आरएसएस भाजपा आहे. टेल्कोच्या समाज विकास विभागाने केलेल्या ग्रामीण विकासाच्या कामावरचे आयत्या बिळावरचे नागोबा म्हणजे गन्नासाहेब. एक सुमार वकुबाचा, आत खाकी अर्धी चड्ड्या आणि वर पांढरे धोतर घालणारा बेरकी इसम. २०१२ ते १४ या काळातील त्यांच्या सगळ्या मोहिमा या संघ प्रायोजित मोहिमा होत्या.

टिलीत तोमय्या यांना जसे फक्त विरोधी पक्ष आणि नेतेच भ्रष्टाचारी दिसतात, तसेच हे नकली गांधी. ज्यांना विशिष्ट जातीतील लोकांचा भ्रष्टाचार कधीच दिसला नाही. कधी एखाददुसरा आरोप केला तरी नन्तर हळूच त्यांनी तो मागे घेतला. आठवा फडणवीस काकूंचा डाळ घोटाळा.

निवडणुका लढवायला पैसा लागतो. तो सगळे पक्ष कसा कमावतात हे उघड गुपित आहे. पण गन्ना आणि टिलीत किंवा अण्णांच्या वाजंत्री कंपणीतले बँडवाले यांना फक्त बहुजन नेतेच भ्रष्टाचारी दिसतात. गेली आठ वर्षे गन्ना आणि टोळी झोपून आहे. कारण 'संघ'टीत भ्रष्टाचार त्यांना दिसतच नाही. भ्रष्टाचारी मग ते कुणीही असतील तरी त्याविरुद्ध यांनी मोहिमा का चालवल्या नाहीत? कारण त्यांना भ्रष्टाचार निर्मुलन नकोय, त्याच्या बुरख्यात बहुजन निर्मूलन साधायचेय.

खरे नथुभक्त हे लोक आहेत. यांच्यामुळे भगव्या कपड्यातले नटवे सत्तेवर आले.संविधानाची आज जी मोडतोड चालू आहे हे सारे पाप ह्या टोळीचे आहे. कारण यांचा भ्रष्टाचार निर्मुलन हा फक्त सांगण्यासाठी निवडलेला लॉग इन आयडी होता. यांचा पासवर्ड संघ भाजपा आहे, हे नागडे सत्य आहे... : प्रा. हरी नरके

Hari Narke-Vishwambhar Choudhri
पवार- पूनावाला असाही योगायोग : एकाच बॅचच्या दोन काॅलेजमित्रांना पद्मपुरस्कार

नरके यांच्या या पोस्टला चौधरी यांनी दिलेले उत्तर हे असे

प्रिय हरी नरके सर,

तुमची ही पोस्ट वाचून आश्चर्य वगैरे वाटलं नाही पण थोडा भ्रमनिरास जरूर झाला तो खालील कारणांसाठी:

१. गन्ना पगारे हे अण्णा हजारे या नावाचं रुपांतर एखाद्या नामचीन ट्रोलानं करणं वेगळं, तुम्ही लिहीणं वेगळं. महाराष्ट्र तुम्हाला विचारवंत मानत आला, ही विचारवंताची भाषा नाही. पुढे तुम्ही खा. किरीट सोमैयांचा उल्लेख 'तिलीत' असाही केलाय. पण नावाचं किंवा न्यूनाचं विडंबन तुम्हाला अगदी परवापर्यंत मान्य नव्हतं. कोल्हे यांच्या आडनावावरून ट्रोल करणारांना तुम्ही योग्यच झापलंय. स्क्रीनशाॅट इकडे टाकलाय मी तुमच्या त्या समज देण्याचा. आडनावाचं विद्रूपीकरण न होण्याचा हक्क फक्त खा. कोल्हे यांनाच आहे की अण्णांनाही?

२. अण्णांवरची शेरेबाजी मी दुर्लक्षित करतो कारण ती फेसबुकवर चालणारी अतिशय नियमीत बाब आहे. सर्वपक्षीय ट्रोलांनी काही एक भाषा इकडे रुजवली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लढणारे तुमच्यासारखे महनीय लोकही त्याच भाषेत बोलत असतील तर कालगती म्हणून त्याकडे मी दुर्लक्ष करतो. पण तुम्ही केलेल्या आरोपांवर मला उत्तर देणं भाग आहे.

अण्णांना फक्त बहुजनांचा घोटाळा दिसला असा तुमचा आरोप आहे.

अण्णा स्वतः बहुजन आहेत की अभिजन? शोभाताई फडणवीस यांच्याविरोधात (डाळ घोटाळ्याचे आरोप) अण्णांनी उपोषण केलं हेच कदाचित तुम्हाला माहीत नसल्यानं तुम्ही नेमकं तेच उदाहरण दिलं असावं. माझ्या माहितीप्रमाणे शोभाताई (आपल्या परिभाषेत) बहुजन नाहीत. सुरेशदादा जैनही बहुजन नसावेत.

आता इथं तुम्हाला बहुजन म्हणजे कोण म्हणायचं ते मला स्पष्ट नाही. इतर मंत्री जे अण्णांमुळे घरी गेले त्यांच्यात नवाब मलिक वगळता अन्यांच्या जाती मला माहीत नाहीत त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही.

यापुढे अण्णांनी जात पाहून भ्रष्टाचाराचे आरोप करावेत का?

३. संपूर्ण पोस्टभर तुम्ही खूप चिडचीड करून शेरेबाजी केलीत. त्या शेरेबाजीकडे मी दुर्लक्ष करतो.

अण्णांनी २०१२ ते २०१४ जे केलं ते संपूर्ण संघाच्या इशाऱ्यावर असा तुमचा आरोप आहे. कदाचित शांतीभूषण, प्रशांत भूषण, योगेंद्र, मेधाताई, राजेंद्रसिंह, राजगोपाल, स्वामी अग्निवेश हे सेक्युलर लोक सोबत असतांना म्हणजे २०११ साली मुख्य आंदोलन मात्र स्वतंत्र बुद्धीनं झालं असं तुमचं आकलन असेल तर मी त्याचं स्वागत करतो.

फक्त एक किरकोळ मुद्दा लक्षात आणून देतो की तुम्ही सांगताय त्या २०१२ सालीच टीम दुभंगली त्यामुळे २०१२-२०१४ या काळात काहीच घडलं नाही. अण्णांनी फक्त दोन उपोषणं केली लोकपालसाठी, बाकी काहीच घडलं नाही! २०१३च्या डिसेंबरमध्ये मनमोहन सरकारनं कायदा आणला. पुढे फार काही घडलं नाही. एक तर कालखंड लिहिण्यात काहीतरी चूक असावी किंवा २०११ पासून संघ संबंध असावा पण या महनीय व्यक्तींच्या तो लक्षात आला नसावा.

Hari Narke-Vishwambhar Choudhri
आंदोलनकर्त्या महिली कामगारांची समजूत काढण्यासाठी आमदार झाडावर चढले

चौधरी यांच्या उत्तराला नरके यांचे आक्रमक प्रत्युत्तर

मित्रवर्य, जिव्हारी लागणारे लिहायचे नाही असे मी ठरवले होते. पण दरच वेळी तुम्ही आमच्या वस्तीची बेअब्रू करीत सुटाल तर संयम कुठवर ठेवायचा? बोटचेपेपणा करून मन कुठवर मारायचं? लिहिणे भाग पडते. गन्नावर लिहिले तरी तुम्ही स्वतःवर घेणार तर अवघड आहे. आमचा घोडनदीचा शेजारी काय लायकीचा आहे हे तुम्हा गोदावरीवाल्यांकडून समजून घ्यायची आम्हाला आवश्यकता नाही. ते जन्माने कोण आहेत याला शून्य महत्व आहे, ते आरत्या कोणाच्या करतात, हस्तक कोणाचे असतात ते जगजाहीर आहे मित्रवर्य! तुम्ही का आम्हा शेजाऱ्यामध्ये येताय?

१) "सिर्फ एकही मारा?" असे जाहीरपणे विचारणारा इसम गांधीवादी कसा काय असू शकतो? बाय द वे असला माणूस तुमचा आदर्श असेल तर तुमच्याही साधनसुचितेवर प्रश्नचिन्ह लागणार मित्रवर्य! दरवेळी त्यांच्यावर लिहिले की तुम्ही का उत्तर देता? तुम्हाला त्यांनी 'कुलमुखत्यार' नेमलंय काय? त्यांच्यावर लिहिण्यासाठी तुमची किंवा तुमच्यावर लिहिण्यासाठी त्यांची परवानगी हवी कशाला? त्यांच्या एखाद्या मुद्द्याला समर्थन दिले म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी तुम्ही उल्लेखिलेल्या मान्यवर लोकांवर कशी काय येते?

२) जे शतकानुशतके 'राजाश्रय आणि आपणच फिर्यादी आणि न्यायाधीशही' अशा कवचकुंडलात आणि अभिनिवेशात जगतात त्यांनी इतरांना 'राजाश्रय घेणारे' म्हणून हिनवावे हे काही पटण्याजोगे नाही.

३) विचारकलहाचा वारसा मान्य असेल तर असहमती असणारच ना? न्यायालयाचा निकाल लागण्याआधीच तुम्ही काहींना गुन्हेगार घोषित करता. आणि जे भ्रष्टाचारशिरोमणी असूनही केवळ स्वकीय आहेत म्हणून तुम्ही त्यांना 'दमानी या ' अशी सवलत देता ते आम्हाला कसे पटावे?

४) पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यायला तुम्ही जाहीर विरोध केला होता, यावरून तुमचे 'वैचारीक स्कुल कोणते असावे' एव्हढेही आम्हाला कळत नसेल का?

अधिक कशाला लिहायला लावता? दरवेळी 'बिचमे मेरा चांदभाई' करू नका.

अधिकउणे झाले असेल तर विश्वाचे आर्त समजून घेणारांनी आमचाही आक्रोश समजून घ्यावा, मित्रवर्य!

: प्रा. हरी नरके

Hari Narke-Vishwambhar Choudhri
करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे 'बिग बुल' बनून आला पोलिसांसमोर!

नरके यांच्या या पोस्टने चौधरी व्यतीथ

जे पुरोगामी म्हणवून घेऊन सतत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जातीत ढकलत राहतात अशा मित्रांपासून सुटका करून घेण्याची वेळ आलेली आहे. मैत्रीत वैर नसते. फेसबुकवरची का असेना, थोडातरी ओलावा असावा लागतो. तो संपला असेल तर प्रत्येक बाबतीत भांडत बसण्यापेक्षा प्रेमानं निरोप घेतलेला बरा . ज्या आहेत त्या भूमिका सगळ्यांसमोर आहेत. कोणाचीही मिंधेगिरी करणार नाही. ना कोणत्या पक्षाची, ना नेत्याची. भूमिका पटत नसतील तर अन्फ्रेंड करण्याचा मार्ग मोकळा आहे. मी होऊनही काही लोकांचा निरोप घेणार आहेच.-हार्दिक शुभेच्छा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com