
Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. तसेच राज्यभर आंदोलनही केलं आहे. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयात कामकाज करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे कामकाज ठप्प झालं आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सर्व कर्मचारीही संपावर गेल्यामुळे येथील कामकाजही ठप्प झालं आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व कर्मचारी मुख्यालयात आले. पण कामकाज करण्यासाठी नव्हे तर, संपात सहभागी होत, धरणे आंदोलन करण्यासाठी ते आल्याचे दिसून आले.
परिणामी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यालयात खाते प्रमुखच हजर तर, कर्मचारी कार्यालयाबाहेर, असे चित्र मंगळवारी दिसून आले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी झेडपी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. या संपाचा आज पहिला दिवस होता. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
या संपामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील अंतर्गत सर्व कार्यालयातील कर्मचारी एकजुटीने सहभागी झाले आहेत. मात्र, या संपामुळे मुख्यालयातील सर्व विभाग नियमितपणे सुरु असूनसुद्धा कार्यालयात मात्र शुकशुकाट जाणवत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.