कृष्णप्रकाश यांची बदली रद्द करण्यासाठी आता थेट राज्यपालांनाच साकडं

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नुकत्याच झालेल्या मुदतपूर्व बदलीचे पडसाद उमटणे अद्याप सुरुच आहे.
कृष्णप्रकाश यांची बदली रद्द करण्यासाठी आता थेट राज्यपालांनाच साकडं
CP Krishna Prakash Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (PCMC) पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नुकत्याच झालेल्या मुदतपूर्व बदलीचे पडसाद उमटणे अद्याप सुरुच आहे. अगोदर काम केलेल्या ठिकाणीच ती पुन्हा झाल्याने हा आपल्यावर अन्याय असल्याचे सांगत त्यांनी स्वत: बदली रद्द व्हावी म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. त्याकरिता त्यांनी काल (ता. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) बारामतीत जाऊन भेट घेतली. आता राज्यपालांकडेही कृष्णप्रकाश यांची बदली रद्द करण्याचे साकडे घालण्यात आले आहे.

कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांची मुदतपूर्व बदली चुकीची, अन्यायकारक असून ती आगामी महापालिका निवडणूक समोर ठेवून करण्यात आल्याने ती रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन युर्वा मोर्चा, कष्टकरी पंचायत, भिमशाही युवा संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचेकडे बदलीच्या दुसऱ्या दिवशीच (ता. २१) करण्यात आली होती. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांनाच काल (ता. २३) साकडे घालण्यात आले आहे. ही मुदतपूर्व बदली रद्द करून कृष्णप्रकाश यांना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून कायम ठेवावे, अशी मागणी माहिती अधिकार महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी राज्यपालांकडे केली आहे. अन्यथा आपल्या दालनापुढे उपोषण करण्याचा इशारा त्यांनी राज्यपालांना काल (ता.२३) दिलेल्या निवेदेनातून दिला आहे.

CP Krishna Prakash
राजकारण तापलेलं असताना शरद पवार अन् फडणवीस एकाच व्यासपीठावर!

कृष्णप्रकाश हे कर्तव्यनिष्ठ,अभ्यासू आणि सभ्य गृहस्थ असून त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक बदल झाल्याचे आऱटीआय़ कार्यकर्ते नाईक यांनी म्हटले आहे.त्यांनी गुन्हेगारीत दहशत निर्माण केली असताना त्यांची बदली होणे गंभीर असल्याने ती का झाली याच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. २० एप्रिलला कृष्णप्रकाश यांची बदली झाली तेव्हा ते अमेरिकेला बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी गेले होते. तेथून २२ तारखेला ते परत आले. पण, त्यापूर्वीच त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या अंकुश शिंदे यांनी २१ तारखेला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता.

आपल्या पद्धतीने लगेच कारभारही त्यांनी सुरु केला. अवैध धंद्याविरुद्ध कृष्णप्रकाश सुरु केलेले गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे विशेष पथक बरखास्त केले. सामाजिक शाखा पूर्ववत कायम असून या विभागांतर्गत असलेले खास पथक तेवढे बरखास्त केल्याचा खुलासा या विभागाचे पीआय देवेंद्र चव्हाण यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज केला. दरम्यान, नव्या पोलिस आय़ुक्तांनी पदभार घेऊन कारभारही सुरु केल्याने बदली रद्द होण्याची शक्यता आता जवळपास पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी मुंबईत (स्पेशल आयजी,व्हीयआयपी सुरक्षा) हजर व्हावे लागणार आहे.

CP Krishna Prakash
परवानगी मिळो न मिळो राज ठाकरे सभा घेणारच; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं...

कम्यूनिटी पोलिसिंगवर कृष्णप्रकाश यांचा भर होता. पण, तो देताना ते प्रमाणापेक्षा जास्त समाजात मिसळत गेले. त्यातून काही असामाजिक तत्वांशी त्यांचा सबंध आला. त्यांनी त्यांचा गैरफायदा घेतला. मात्र, गु्न्हेगार व गु्न्ह्यांची माहिती मिळण्यासाठी त्यांनी तो काही ठिकाणी जाणीवपूर्वक तयार केल्याची सफाईही त्यावर देण्यात आली होती. फुटकळ तपासासाठीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रसिद्धी घेण्याच्या कार्यपद्धतीमुळेही ते टीकेचे धनी झाले होते. खून, बलात्कार, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे वाढत असताना त्यांना पायबंद घालण्याचे सोडून त्यांचे खास पथक गुटखा पकड, मसाज सेंटरवर धाड, अवैध दारु पकडणे यासारखी कारवाई करीत असल्याने त्याचीही चर्चा झाली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला खूनाच्या प्रयत्नाच्या अटक करणे, भाजपचे माजी उपमहापौर नगरसेवक केशव घोळवेंना खंडणीच्या गुन्ह्यात पकडल्याने व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केल्याने ते राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांच्याही रडारवर आले होते. एकूण अशा परिस्थितीतून त्यांची मूदतपूर्व बदली झाल्याने ती रद्द होण्याची शक्यता दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.