अजित पवारांच्या पुढाकारातून २३ गावांच्या समावेशाचा निर्णय  - Decision to include 23 villages through Ajit Pawar's initiative | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांच्या पुढाकारातून २३ गावांच्या समावेशाचा निर्णय 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

23 गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत शासननिर्णय झाला असून, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे. पुणे शहरालगतच्या परिसराचाही पुणे शहराप्रमाणे विकास होईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज सांगितले.(Decision to include 23 villages through Ajit Pawar's initiative) 

गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित अशा २३ गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, या गावांच्या समावेशामुळे पुणे महानगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महानगरपालिका झाली आहे. पुणे हे शहर महानगर म्हणून विकसित झाले असून, त्या धर्तीच्या सुविधा या नव्याने समाविष्ट २३ गावांतही लवकरच उपलब्ध होतील, असे जगताप यांनी म्हटले आहे. 

या २३ गावांचा महानगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर आदरणीय अजितदादांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाला आहे. आता बाणेर, बालेवाडी यांसारख्या महापालिकेत नव्याने आलेल्या भागाप्रमाणेच या २३ गावांचाही विकास होईल, यात काही शंका नाही. यापूर्वी राज्यात व महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना ज्याप्रकारे पुणे शहराचा चौफेर विकास करण्यास प्राधान्य देण्यात आले होते, ती विकासाची साखळी यापुढेही कायम राहणार आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेल. गेल्यासाडेचार वर्षांपासून शहराच्या विकासाला जी खीळ बसली आहे, ती नक्कीच महापालिका निवडणुकीनंतर दूर होईल, असा विश्‍वास जगताप यांनी व्यक्त केला.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख