केंद्रीय मंत्री सीतारामन यांच्यासमोरच राहुल कुलांनी बोलून दाखवली दौंडच्या मंत्रिपदाबाबतची खंत!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भलेभले पंगा घेत नाही. मात्र, युवा आमदार कुल यांनी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपसाठी हे धाडस दाखवले. याचे रिटर्न गिफ्ट कुल यांना कधी मिळणार, याची कुल समर्थकांना उत्सुकता आहे.
Nirmala Sitharaman-Rahul kul
Nirmala Sitharaman-Rahul kulSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे (BJP) पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी स्वातंत्र्यानंतर दौंड तालुक्याला अद्याप मंत्रीपद मिळाले नसल्याची खंत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यापुढे बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कुल यांना रिटर्न गिफ्ट कधी देणार, याची उत्सुकता आहे. (Daund has not yet received a ministerial post : Rahul Kul)

बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्या आल्या असताना त्यांची राहू (ता. दौंड) येथे जाहीर सभा झाली त्यावेळी कुल बोलत होते. या वेळी कुल यांनी कोविड काळात केलेले काम व दौंडकरांच्या अपेक्षा याबद्दल आपले मत व्यक्त केले. खासगीत बोलताना राहुल कुल मंत्रिपदाबाबत फार आग्रह दाखवत नसले तरी त्यांच्या भाषणातून काल मंत्रिपदाची खदखद व्यक्त झाली.

Nirmala Sitharaman-Rahul kul
फडणवीसांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यातच मान्य केली अन्‌ नरेंद्र पाटलांच्या नावाची घोषणा केली!

दौंडचे दिवंगत आमदार सुभाष कुल यांचे कुटुंबीय कुल यांच्या निधनानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मात्र, क्षमता असूनही सुभाष कुल किंवा आमदार रंजना कुल यांचा मंत्रिपदासाठी विचार झाला नाही. त्यानंतर २०१४ मध्ये राहुल कुल राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राहुल कुल यांना उमेदवारी दिली. जानकर यांनी कुल यांना निवडून द्या; मी त्यांना मंत्री करतो, असे आश्वासन दौंडच्या जनतेला दिले होते. कुल यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सहज विजय मिळविला.

Nirmala Sitharaman-Rahul kul
फडणवीस सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कसं पेलवणार..? पण त्यांना माझ्या शुभेच्छा : अजित पवार

भाजप व मित्रपक्षांची २०१४ मध्ये सत्ता स्थापन होताना प्रत्यक्षात राहुल कुल यांना मंत्रिपदापासून दूर ठेवत जानकर यांनी स्वतः मंत्रिपद घेतले. दरम्यान, २०१४ ते २०१९ दरम्यान राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये गेले. केवळ फडणवीसांच्या आग्रहाखातरच कांचन कुल यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात २०१९ च्या निवडणुकीत लोकसभेला उतरविण्याचे धाडस कुल यांनी दाखवले. या सर्व राजकीय घडामोडीत कुल यांनी पक्षाची मर्जी राखण्यासाठी थेट पवार कुटुंबीयांशी पंगा घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भलेभले पंगा घेत नाही. मात्र, युवा आमदार कुल यांनी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपसाठी हे धाडस दाखवले. याचे रिटर्न गिफ्ट कुल यांना कधी मिळणार, याची कुल समर्थकांना उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत दौंडचा मंत्रीपदाचा वनवास संपविणार का, हे आगामी काळात पहावे लागणार आहे.

Nirmala Sitharaman-Rahul kul
आठवलेंची डबल ढोलकी : ‘बारामतीत पवारांचा पराभव नको; पण भाजपचा विजय हवा’

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी कुल यांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो. असे आश्वासन दौंडकरांना दिले होते. पुणे जिल्ह्यात भाजपची मोठी पडझड होत असताना कुल यांनी पक्षाचे आस्तित्व टिकवून ठेवले. महाविकास आघाडी सरकारमुळे मंत्रीपदाचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांना पाळता आले नाही. मात्र, आता पुन्हा सरकार आल्यामुळे दौंडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, दौंडला मंत्रीपदासाठी झुलवत ठेवल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश तालुक्यांना मंत्रीपद मिळाले आहे. मात्र, दौंडला प्रत्येक वेळी मंत्रीपदाची हुलकावणी मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in