पोलिसांना आव्हान देत गुंडांनी मिरवणूक काढली; पण ते घरी नाही पोहोचले! - criminalas marched but they did not reach home | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांना आव्हान देत गुंडांनी मिरवणूक काढली; पण ते घरी नाही पोहोचले!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 जुलै 2021

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची खास मुलाखत....

पुणे : मुंबईच्या तळोजा कारागृहातून गुंड गजानन मारणेची (Gajanan Marane) सुटका झाली. वाजत-गाजत मिरवणुकीने तो पुण्याच्या दिशेने निघाला पण पुणे पोलिसांच्या तत्परमुळे तो घरी पोचण्याच्या आत त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत त्याच्या अनेक साथीदारांनाही अटक करण्यात आली. अशाप्रकारे समाजात दहशत माजविणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता (Amitabh Gupta)  यांनी दिला. (Pune Police commissioner Amitabh Gupta warns criminals) 

पुण्यात पोलीस आयुक्त म्हणून गुप्ता यांनी कामाला सुरवात केली त्याला आता नऊ महिने उलटले. या काळात पुण्यातल्या गुंड टोळ्यांची पाळे-पुळे खणून काढण्याचे काम पुणे पोलिसांनी केल्याचे गुप्ता यांनी सांगितले. ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुप्ता यांनी गेल्या नऊ महिन्यात केलेल्या ठळक कामांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ छोट्या-मोठ्या ३९ टोळ्यांवर कारवाई करीत गेल्या नऊ महिन्यांत तब्बल साडेतीनशे गुंडांवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून यापुढेदेखील गुंडांबाबत हीच भूमिका कायम राहील. सामान्य माणसाला भीतीमुक्त वातावरणात जगता आले पाहिजे, ही भूमिका असून हाच आपला प्राधान्यक्रम राहील.’’ 

गुंडांची तुरुंगातून मिरवणूक निघणे हे पोलिसांसाठी आव्हान होते का, या प्रश्नावर ते म्हणाले की अनेक गुंडांवरील कायदेशीर कारवायांची मुदत एकामागोमाग संपली. कोणी तुरुंगातून सुटले तर कोणी अन्य कठोर कारवाईतून. त्यामुळे एकाच कालावधीत त्याच्या बातम्या आल्या. ज्यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढली त्यांची आम्ही पाळेमुळे खणून काढली. तुरुंगातून सुटल्यानंतर पोलिसांना आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्यानंतर मग आम्ही उसंत घेतली नाही. हे गुंड त्यांच्या घरी पोहोचायच्या आम्ही अॅक्शन घेतली. या गुंडाचे फोटो व्हाटस अप डीपी, फेसबुकवर लावून मिरविणाऱ्यांनाही सोडले नाही. त्यामुळे पुण्यात काही दिवसांतच या गुंडांचा बिमोड करून त्यांना पुन्हा डांबण्यात पोलिसांना यश आले.  

 

गुप्ता म्हणाले, ‘‘ गुंड टोळीप्रमुख व त्यांच्या साथीदारांवर मोकाची कारवाई केल्याने अनेक सामान्य लोकांच्या या गुंडांनी बळकावलेल्या जमिनी आपोआप रिकाम्या झाल्या. अनेकवेळा प्रयत्न करूनही सामान्य माणसाचे जे काम होत नव्हते ते काम या कारवाईमुळे परस्पर झाले. खंडणीखोर बराटे व त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली असून या सर्वांवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. सामान्य माणसाला पोलिसांचा आधार वाटेल असेच पोलिसांचे वर्तन असायला हवे या भूमिकेतून सर्व काम करीत असून यापुडे या संदर्भात अधिक काळचजी घेण्यात येईल.’’ 

अडचणीत असलेला सामान्य माणसाने मदतीसाठी पोलिसांना शंभर क्रमांकावर फोन केल्यानंतर त्याला मदत करण्यासाठीचा ‘रिस्पॉन्स टाईम’ सध्या सरासरी आठ मिनिटांचा आहे. तो आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. 
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख