पिंगळेच्या कबुलीने PCMC स्थायी समितीचे सोळाही सदस्य हादरले : लाचेची रक्कम सर्वांची?

पिंगळेने तीन टक्के हे १६ जणांना द्यावे लागतात, ते कोण त्यांचा शोध घ्यायचा आहे, लांडगेंच्या इतर मालमत्तेचा शोध घ्यायचा आहे,अशी कारणे सरकारी वकिलांनी आऱोपींच्या पोलिस कोठडीसाठी दिली.
पिंगळेच्या कबुलीने PCMC स्थायी समितीचे सोळाही सदस्य हादरले : लाचेची रक्कम सर्वांची?
Nitin Landage

पिंपरी : लाच म्हणून घेण्यात येणारी टेंडरच्या तीन टक्के रक्कम ही १६ जणांत वाटली जाते,असे पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीचे (PCMC standing commitee)  अध्यक्ष तथा सभापतींचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे यांनी सांगितल्याची माहिती एसीबीच्या वतीने आज (ता.१९) पुणे येथील विशेष न्यायालयात देण्यात आली.ते कोण, त्यांचा शोध घ्यायचा आहे,असे एसीबीने न्यायालयाला सांगितल्याने  स्थायी समितीतील भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण हे १६ जण म्हणजे स्थायी समितीचे सर्वपक्षीय १६ सदस्य असल्याचा एसीबीचा अंदाज आहे.

पिंगळेसह (वय ५६,रा.भोसरी) स्थायी समितीचे इतर तीन कर्मचारी अरविंद कांबळे (वय ५०, रा. पिंपरीगाव), राजेंद्र शिंदे (वय ५०, रा. थेरगाव), विजय चावरिया (वय ३८, रा. चिखली) आणि अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (वय ५२,रा.भोसरी) यांना एसीबीने काल एक लाख १८ हजार रुपयांची लाच एका जाहिरात ठेकेदाराकडून घेताना अटक केली आहे. त्या सर्वांना येत्या शनिवारपर्यंत (ता.२१) म्हणजे दोन दिवसांची पोलिस कोठडी पुणे येथील विशेष न्यायालयाने दिली आहे.

हे एक मोठे रॅकेट असल्याचे एसीबीने न्यायालयात सांगत आऱोपींच्या सखोल तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी मागितली.  त्याला आऱोपी लांडगेंचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी विरोध केला. लांडगेंना यात गुंतविण्यात आले असून वर्क ऑर्डर काढण्याचे काम त्यांचे नाही, तर प्रशासनाचे आहे,असे त्यांनी सांगितले. तर, पिंगळे यांच्या कार्यालयात म्हणजे स्थायी समितीच्या केबिनमध्ये पाच लाख वीस हजार रुपये एसीबीच्या हाती लागले आहेत. तर आऱोपी पिंगळेच्या अंगझडतीत ४८ हजार ५६०,तर दुसरा लिपिक शिंदेकडे २४ हजार ४८० रुपये मिळून आले आहेत, अशी माहिती न्यायालयाला देत आरोपींचे इतर कोणी साथीदार आहेत का, तसेच पिंगळेने तीन टक्के हे १६ जणांना द्यावे लागतात, ते कोण त्यांचा शोध घ्यायचा आहे, लांडगेंच्या इतर  मालमत्तेचा शोध घ्यायचा आहे,अशी कारणे सरकारी वकिलांनी आऱोपींच्या पोलिस कोठडीसाठी दिली.

लांडगेंनी पिंगळेला लाचेचा सापळा झालेल्या दिवशी म्हणजे स्थायी समितीच्या बैठकीच्या दिवशी काल (ता.१८) पाच लाख वीस हजार रुपये दिले होते. ते कसले याबाबत पिंगळेने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याचाही तपास करायचा आहे,असे एसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

याप्रकरणी एकमसिंग रविंदरसिंग कोहली (वय २४,रा. दापोडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांची कोहली अॅडव्हरटायझिंग नावाची फर्म आहे. ते होर्डिंग्जचा ठेका घेऊन ते लावतात.त्यांच्या मंजूर झालेल्या अशा कामाच्या सहा टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एक लाख १८ हजार रुपये लाच मागून ती आरोपींनी घेतली होती. आणखी त्यांच्या २२ मंजूर टेंडरच्या वर्क ऑर्डर निघणे बाकी आहे. त्यापोटी टेंडरच्या तीन टक्यांप्रमाणे म्हणजे दहा लाख मागून नंतर दोन टक्यांवर म्हणजे सहा लाखांवर तडजोड झाली होती. हा टक्का मागताना इतर ठेकेदारांनी तीन टक्के दिलेत,मग तू का नाही देत, अशी विचारणा पिंगळेने कोहली यांना केली होती. नंतर अॅड. लांडगे यांनी तीन टक्के नाही,तर दोन टक्के ती घेण्यास पिंगळेंना सांगितले होते, अशी माहितीही एसीबीने न्यायालयात दिली.

Related Stories

No stories found.