नाना पटोले यांनी दिली संग्राम थोपटेंना ‘गुड न्यूज’ : तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार!

तुम्हाला काय पाहिजे, हे एकदा ठरवा. कारण, लढवय्या माणसाने मैदानातच राहिले पाहिजे.
Nana patole-Sangram Thopte
Nana patole-Sangram ThopteSarkarnama

पुणे : ‘‘तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत, त्याबद्दल एवढंच सांगतो की, तुम्हाला आता जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. ती लवकरच संपुष्टात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळातील जागा भराव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. बघू हायकमांड काय करतंय ते. पण येत्या चार ते पाच महिन्यांत तुमच्या मनातील गोष्ट पूर्ण होईल, अशी माझी अपेक्षा आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte) यांच्या मंत्रीपदाबाबत भाष्य केले. (Comment by Nana Patole on MLA Sangram Thopte's ministerial post)

पटोले यांच्या हस्ते वेल्हे तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात पटोले बोलत होते. त्यावेळी त्यांनी संग्राम थोपटे यांच्या बहुचर्चित मंत्रीपदाबाबत भाष्य केले. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथम आलेल्या प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी थोपटे यांच्या मंत्रीपदाबाबत भाष्य करत आमदार थोपटे आणि समर्थकांना एकप्रकारे गुड न्यूजच दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

Nana patole-Sangram Thopte
आंबेगाव-मंचरमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांनी उडाली खळबळ

ते म्हणाले की, तुमच्या मनातील गोष्ट येत्या चार ते पाच महिन्यांत पूर्ण होईल. मी तर संग्रामदादा थोपटे यांना मी म्हटलं आहे की, मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, त्या खुर्चीवर तुम्हाला बसायचे असेल तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही. तुम्ही वाघासारखे आहात, तुम्हाला मैदानात राहायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे, हे एकदा ठरवा. कारण, लढवय्या माणसाने मैदानातच राहिले पाहिजे. मी ज्या खुर्चीवर बसलो होते, त्या खुर्चीवर मी हंटर मारत होतो. त्या खुर्चीच्या बाहेर मला येता येत नव्हते. ती खुर्ची सोडली आणि प्रदेशाध्यक्ष झालो, त्या माध्यमातून मला राज्यभर आपल्या पक्षाची भूमिका मांडता आली. त्यामुळे तुम्ही निर्णय करा, तुम्ही म्हणाल ती भूमिका आपण घेऊ, त्या कोणतीही अडचण नाही.

Nana patole-Sangram Thopte
भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल कराव्यात

काहीजण आम्हाला मुंबईत सांगत होते की तुमचे पुणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत आणि त्या दोघांचे एकमेकांशी पटत नाही. पण आमचे पुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप स्वतः म्हणतात की, तुम्ही संग्राम थोपटे यांना मंत्री करा. त्यामुळे येथे तर कुठेच वाद नाही. पण पुण्यात बाकीचे लोक आपल्यात आग लावण्याचे काम करत आहेत. आमचे आमदार आणि कार्यकर्ते एकच आहेत. आपल्याकडे जे आलबेल आहे, तिकडे आलबेल नाही, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीकडे अंगुलीनिर्देश केला. त्यांच्याकडे आलबेल नसताना ते सर्वकाही व्यवस्थित असल्यासारखे दाखवतात आणि आमच्यात सर्वकाही आलबेल असताना आमच्याकडे तसे नाही, असे दाखवतात, असे सांगून त्यांनी आपला मित्रपक्ष राष्ट्रवादीला चिमटा काढला.

Nana patole-Sangram Thopte
खोत-पडळकरांच्या भूमिकेकडे कामगारांची पाठ, विलीनीकरणाचा लढा सुरु राहणार

पुण्यात प्रदेशाध्यक्ष येत नाहीत, असे सांगितले जात होते. असे काय आहे पुणे जिल्ह्यात. आपल्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे करायला कुणालाही का घाबरायचे. जेव्हा दुसरा आपल्याला दगडगोटे मारतो, तेव्हा त्याचे घर काचेचे असते, हे आपल्याही माहिती असते, त्यामुळे कुणालाही घाबरायचे काम नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम केल्यास तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. पुणे जिल्ह्यात मला सर्वात जास्त लक्ष घालावे लागणार आहे. तुम्हाला जी काही ताकद लागेल, ती मी द्यायला तयार आहे. पण आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी शेवटी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com