
पिंपरी : भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची लागलेली पोटनिवडणूक लढण्याचा ठराव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने परवा (ता.२०) केला. तर, असाच ठराव शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काल (ता.२१) केला.
आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिसरा पक्ष कॉंग्रेसनेही ही जागा लढण्याचा ठराव आज (ता.२२) केला. त्यामुळे उद्योगनगरीतील आघाडीच्या नेत्यांतील पूर्ण बेबनाव आणि विसंवाद समोर आला आहे.
चिंचवड लढण्याचे सांगत शिवसेनेने अगोदरच राष्ट्रवादीचे टेन्शन वाढविले असताना कॉंग्रेसने त्यात आणखी भर टाकली. त्यामुळे चिंचवडचा गुंता वाढतच चालला आहे. चिंचवडला कॉंग्रेसचा उमेदवार देण्याची तयारी असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आज सांगितले.
पाच महिने चाललेल्या राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या `भारत जोडो` यात्रेला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेस ही आता `हात ते हात जोडो` हे दोन महिने चालणारे अभियान २६ जानेवारीपासून सुरु करणार आहे.
त्याच्या तयारीच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेस सह प्रभारी सोनल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या शहर कॉंग्रेसच्या बैठकीत चिंचवड लढण्याचे सुतोवाच झाले. यावेळी शुभांगी घाडगे, वैष्णवी घाडगे, आरती मासुळकर, रेश्मा बनसोडे, सारिका पुरोहित, बापू लोहकरे, संतोष बनसोडे, संतोष चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चिंचवडच्या निवडणुकीत उमेदवार उभा करावा, अशी शहर कॉंग्रेसची भावना पक्ष श्रेष्ठींपुढे मांडणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. महाराष्ट्रात मित्र पक्षांबरोबर राहिल्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसचे नुकसान झाले आहे. तिथे आता लक्ष देऊन पक्ष वाढीसाठी काम केले जाईल. वेळप्रसंगी श्रेष्ठींनी आदेश दिले तर स्वतंत्र लढण्याची देखील तयारी करावी लागेल, असे त्या म्हणाल्या.
चिंचवड लढण्यासाठी दोन महिला आणि चार पुरुष पदाधिकारी तीव्र इच्छुक असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. या ठिकाणी पूर्वी काँग्रेस लढल्याचे सांगत तेथून पुन्हा लढण्याचा आग्रह हा सोमवारी पुण्यात `हात से हात जोडो` सुरु करण्यासाठी येणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे धरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.