
PCMC By-Election News : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महाविकास आघाडी आणि मनसे अशा चार पक्षांच्या शहराध्यक्षांना आवाहन केलं आहे.
त्यावर लक्ष्मणभाऊंबद्दल आदर आहे, परंतू `चिंचवड` विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाच्या राज्यपातळीवरून होईल, असे उत्तर राष्ट्रवादीने दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. दिवंगत आ. जगताप हे शहराचे लोकनेते असल्याने त्यांच्या निधनाचे आम्हालाही दुख: आहे. परंतू भाजपविरोधातील जनभावना आणि राज्यात आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकांत त्यांनी घेतलेली स्वार्थी भूमिका लक्षात घेऊन चिंचवड लढण्याची भूमिका स्थानिक पातळीवर घेण्यात आली असल्याचे उत्तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिले. मात्र,याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असून त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाईल, असही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापूर्वी पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपकडे वारंवार विनंती करूनही त्यांनी सदर निवडणूक बिनविरोध केली नव्हती. त्याशिवाय कोल्हापूर, देगलूर येथेही ती त्यांनी लढविली. तर,मुंबईत शिवसेनेच्या उमेदवाराला त्रास देऊन नोटाचा प्रचार करण्याची भूमिका घेतली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षांच्या आमदारांचे निधन झाल्यानंतर वेगळी भूमिका आणि आपल्या आमदाराचे निधन झाल्यानंतर भावनिक आवाहन करून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भूमिका घेणे हा स्वार्थी प्रकार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
पिंपरी पालिकेत गेल्या पाच वर्षांत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी चुकीचा कारभार केला. त्यामुळे चिंचवडची निवडणूक बिनविरोध करणे म्हणजे चुकीच्या कामांना पाठींबा देण्यासारखे ठरू शकते.भाजपने यापूर्वी चुकीची आणि स्वार्थी भूमिका घेऊन पोटनिवडणुका लढविल्यामुळे शहरातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक लढविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. आ.लांडगेंनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे.अशी टिपण्णीही त्यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.