
Pimpri Chinchwad News : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत आज (ता.२०) करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवायचे त्यात ठरले.
मागच्या वेळी चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊनही त्यांनी तिथे स्वत:चा उमेदवार दिला नव्हता. शिवसेना बंडखोर अपक्ष राहूल कलाटे यांना त्यांनी पुरस्कृत केले होते. मात्र, यावेळी घड्याळावरच ही निवडणूक लढवायची, असा शहर राष्ट्रवादीने ठराव करून निश्चीत केले. त्यातून थोड्या वेळापूर्वीच सरकारनामाने दिलेली बातमी खरी ठरली आहे. आयात उमेदवार चालणार नाही, असा इशारा चिंचवडमधून इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने या बातमीतून दिला होता. त्याची दखल या बैठकीत घेत पक्षाचाच उमेदवार देण्याचे ठरले.
शहर राष्ट्रवादीने आज केलेला हा ठराव उद्या पुण्यात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांना देणार असून त्यावर ते जो काय निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या बैठकीनंतर सरकारनामाला सांगितले. चिंचवडवर सक्षम दावेदारी करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या या मतदासंघांत पक्षाचा आमदार करण्याची संधी सोडू नये, असा ठराव याबैठकीत एकमताने पारित केल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी पिंपरी पालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहत असल्याचे ते म्हणाले.
'एक महीना आपल्याला घरी जायचे नाही आणि विजयश्री खेचून आणायची आहे,' असे म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी बैठकीतील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. आता कोणाची भीतीही नाही आणि सहानुभूतीही नाही, असे ते सूचकपणे म्हणाले. कालच या मतदारसंघातून उमेदवार म्हणून दावा ठोकलेले पिंपरी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पालिका जिंकण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असल्याने ती लढणे गरजेचे असल्याचे सांगितले.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मागच्या १० वर्षात राष्ट्रवादीचा आणि अजितदादांनी केलेल्या कामाचा फायदा घेऊन पक्षाचे नुकसान करताना कोणी विचार केला नाही. आता पक्षाने देखील कुणाचा विचार करायची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडले.
शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी देखील ही निवडणूक लढविण्याची भावना बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनी ती पूर्ण ताकदीने लढविण्याची मागणी केली. तसेच ती जिंकू असा संकल्पही त्यांनी बोलूत दाखवला. सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या या भावना पक्षश्रेष्ठी आणि प्रांताध्यक्षपर्यंत घेऊन जाणार असल्याचे गव्हाणे यांनी नंतर सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.